Home August 2022 आवडलेली कविता – अजय कांडर

आवडलेली कविता – अजय कांडर

जाफर आणि मी

जाफरच्या घरी रमजानचं शरबत प्यालो

त्याच्या निकाहला शाही बिर्याणी

त्याची आई माझ्याच आईसारखी

घरासाठी खपताना चेहर्‍यावरचे छिलके निघालेली

त्याच्या घराच्या भिंती माझ्याच घराच्या भिंताडासारख्या

कुठे कुठे पोपडे निघालेल्या

त्याचे बाबा हळहळतात माझ्याच बाबांसारखं

फाळणीच्या दिवसांबद्दल बोलताना

त्याच्या भाजणीतलं मीठ

माझ्याच घरातल्या डब्यातल्या मिठासारखं

त्याच्या आमटीतलं पाणी एकाच जमिनीतून आलेलं

माझ्या तुळशीवर पडलेला सूर्यप्रकाश

त्याच्या मशिदीच्या आवारातल्या

नीमच्या सळसळीतून मावळलेला

तोही तिरुपतीला एकदोनदा व देहूला जाऊन अलेला

मीही कितीतरी वेळा खजूर व चादर ओढून आलेलो

पिराच्या दग्र्यावर बायकोबरोबर

त्याला मला समकालीन वाटत आलेला

गालिब व तुकाराम

आपल्याच जगण्यातलं वाटत राह्यलं

मंटो व भाऊ पाध्येच्या कथेतलं विश्व

दारूच्या नशेतही वंटास बोललो नाही

की एकमेकांच्या कौमबद्दल कधी अपशब्द

कितीतरी दिवस आतड्यातल्या अल्सरसारखी

छळत राहिली मला

त्याच्या आईला कॅन्सर झाल्याची बातमी

आम्ही अफवा नव्हतो

आम्ही संप्रदायाची लेबलं नव्हतो

आम्ही होतो दोनवेळच्या दाल चावलची

सोय लावताना चालवलेली तंगडतोड

एकवेळची शांत झोप मिळवण्यासाठी चालवलेला

दिवसभरातला आकांत

काय माहीत मात्र काही दिवसांपासून

कोणीतरी फिरवतंय गल्लीमोहल्ल्यांतून

जाफर व माझ्यातल्या वेगळेपणाची पत्रकं

वर्जेश सोलंकी (ततपप)

९० नंतरची जी तरुण पिढी चांगली कविता लिहू लागली त्यातील वर्जेश ईश्वरलाल सोलंकी हे एक ठळक नाव आहे. ९० नंतरच्या जगण्याचे अंतर्विरोध उत्स्फूर्तपणे सहज भाषेत आणि विशेषत: कविता वाचता वाचता वाचक अंतर्मुख करत जाणारा आशय व्यक्त करणारी कविता लिहिताना सोलंकी यांनी सर्वसामान्य माणसाचं कोंडी झालेलं जगणंच वाचकाला

उलगडून दाखवलं. मागील तीन दशकांत या देशात दोन गोष्टी प्रामुख्याने समांतर पातळीवर घडत गेल्या. पहिली गोष्ट खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण अशी एक प्रक्रिया घडत असताना दुसरीकडे `जात आणि धर्माचं’ वर्गीकरण अधिकच घट्ट केलं जाऊ लागलं. आणि त्यातून शोषणाचे स्तर अधिक एकमेकांत पिळवटले गेले. या सगळ्याचा एकसंध परिणाम वर्जेश सोलंकी यांच्या कवितेतून व्यक्त झालेला आपल्याला पाहता येतो. या अर्थाने त्यांची `जाफर आणि मी’ या कवितेचा आपल्याला अधिक सजगपणे विचार करता येईल!

जगातल्या कोणत्याही चांगल्या कवितेचं वर्गीकरण करून ती ग्रामीण कविता आहे विंâवा महानगरीय-नागरी कविता आहे, दलित कविता आहे, आदिवासी कविता आहे अशा अनेक प्रकारचे मापदंड लावता येत नाहीत. कारण उत्तम कविताही माणसाला कोणत्याही काळाचं समग्र भान देत असते. याबाबत आपल्याला अरुण काळे, लोकनाथ यशवंत, दिनकर मनोहर अशा माझ्या पिढीतील अनेक कवींची नावे उदाहरणादाखल घेता येतील (अर्थात अजूनही अनेक मराठी कवींच्या नावांचा यात उल्लेख करता येईल). या यादीतीलच वर्जेश सोलंकी हेही एक नाव असून त्यांची कविता दुर्बोध आणि सुबोध अशा भाषेच्या दोन्ही वर्गांत मोडत नाही. म्हणून ती स्वतंत्रपणे उभी आहे. ही तिची भाषेची गुणवत्ता आपल्याला मान्य करावी लागते.

सोलंकी यांच्या एवूâणच कवितेच्या भाषेबद्दल बोलायचं झाल्यास काही निरीक्षणे आपल्याला येथे सहज नोंदवता येतात. भाषेची प्रयोगशीलता ठरवून केली गेल्यास कवितेच्या भाषेला जडत्व प्राप्त होत जाते. आणि त्यातून तो कवी प्रयोगशील कवी म्हणून समजला

जात असला तरी अशी कविता सर्वसामान्य माणसापासून दूर राहते. या उलट त्या त्या काळातला सर्वसामान्य माणसाचा संघर्ष असतो तो त्याच्याच भाषेत सहजरीत्या कवितेत व्यक्त होत असेल तर ती भाषा कवीबरोबर त्या सर्वसामान्य माणसाची होऊन जाते. वर्जेश सोलंकी

यांच्या कवितेच्या भाषेकडे या नजरेने आपल्याला बघावे लागेल. ती नागरी विंâवा ग्रामीण आहे असं आपण थेट म्हणू शकत नाही. कारण त्यांच्या रोजच्या जगण्यातून आलेले शब्द ते सहज कवितेला भिडवीत नेतात. म्हणून त्यांच्या कवितेची भाषा जनसामान्यांचा आवाज होते. मात्र दुसर्‍या बाजूला ही कविता आवाजी नाही. त्या भाषेमुळेच अधिक समतोल बनत, अनुभवाचं चिंतनशील रूप त्या कवितेला या भाषेमुळेच प्राप्त होते.

कवीची विचारक्षमता हीच कवितेच्या आशयाला अधिक बळकटी देत असते. कवी ज्या पद्धतीचा विचार करतो तोच विचार कवितेत उतरत असतो. आजूबाजूचा भवताल अस्वस्थ असेल आणि त्या भवतालाशी एकरूप होण्याची तुमची भावनाच नसेल तर तुम्ही कविता लिहितानाही अस्वस्थ होत नाही. लोकसमूहात कधीकधी सार्वत्रिक होणे म्हणजे भवतालाशी जोडून घेणे नव्हे; तर जगात घडणाNया, आपल्या आजूबाजूला घडणाNया अघटित घटनांपासून स्वत:ला वेगळं न ठेवता त्याचा साधक-बाधक विचार करण्याची प्रक्रिया आपल्यात सतत चालू राह्यला हवी. वर्जेश सोलंकी यांची कविता वाचताना आजूबाजूला घडणाNया अघटित घटकांना ते आतून स्वत:च्या नकळत जोडून घेताना जाणवतात. म्हणूनच ते `जाफर आणि मी’ सारखी कविता लिहू शकतात. नवी कविता कोणती? किंवा विचारशील वाचकांवर प्रभाव ठेवणारी कविता कोणती? याचं एकच एक उत्तर नसलं तरी समकाळाचा गुंता समजून घेऊन मानवी नात्याला अधिकाधिक घट्ट करत जाणाNया कवितेचा प्रभाव हा दीर्घकाळ टिकतो (म्हणूनच

तर तुकारामाचा विचार कालातीत राहिला). `जाफर आणि मी’ या कवितेत दोन धर्मांमधील वातावरणाचा समंजसपणा जसा आपल्याला भिडत जातो त्याच पातळीवर दोन धर्मांमधील नात्याचा निरागसपणाही आपल्याला हवाहवासा वाटत राहतो. या कवितेमधील दोन धर्मांमधील सांस्कृतिक, धार्मिक, रोटी व्यवहार आदी कृतीही भारतीय भूमीतील खNया राष्ट्रवादाला अधिक

ठळक बनवत जातात. परंतु या कवितेत शेवटी मांडल्याप्रमाणे या समावेशक सहिष्णू राष्ट्रवादाला

नख लावून त्याच्याकडे एकारलेपणाने बघितलं जातं तेव्हा मात्र आपण वाचक म्हणून अधिकाधिक

सजग, अधिकाधिक अंतर्मुख होत जातो; ही या कवितेची महत्त्वाची गुणवत्ता आहे!

The Poetrywala Foundation is envisaged as a discerning and hospitable space in both digital and real-world mode for practitioners and readers of poetry and translation from India.

Copyright @2023  All Right Reserved – Designed and Developed by VR Webtek Solutions

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept