माजी संपादक, एक वाचक – लिहावेसे वाटणारा एक वाचणारा माणूस.
संपादकांनी ‘ओपिनियन’ या सदरासाठी लेखकांना पाठविलेल्या टिपणात दोन प्रश्नांची अति-संक्षेपात चिकित्सा अपेक्षित आहे.
१) आधुनिक, उत्तर-आधुनिक किंवा आधुनिकोत्तर, दलित, ग्रामीण, शहरी, स्त्रीवादी इत्यादी मराठी साहित्यात प्रचलित आणि आता प्रस्थापित झालेल्या साहित्याच्या कोटी (Categories) निर्माण करणे गरजेचे आहे काय?
२) कशी असावी (भविष्यातील मराठी) समीक्षा? कंसातले दोन शब्द माझे.
या दोन प्रश्नांसोबत संपादकांनी त्यांचे एक गृहीतकही मांडलेले आहे. ते असे की – गावं शहरात घुसल्यामुळे आणि शहरं गावात घुसल्यामुळे आणि खासकरून डिजिटायझेशनमुळे विव्रेâता आणि ग्राहक याच माणसाच्या दोन जाती झाल्या आहेत.
पहिल्या प्रश्नाबद्दल –
वाङ्मयीन समीक्षेच्या दोन परंपरा अभ्यासकांसाठी आणि समीक्षकांसाठी उपलब्ध आहेत. पहिली भारतीय किंवा प्राचीन काव्यशास्त्राची परंपरा आणि दुसरी पाश्चात्त्य परंपरा. गेल्या एकशेवीस वर्षांत मराठीची स्वत:ची म्हणून जी समीक्षा लिहिली गेली तिची दोन वैशिष्ट्ये सांगता येतील.
१) मराठी समीक्षकांनी अगदी स्पष्टपणे भारतीय किंवा प्राचीन काव्यशास्त्राची परंपरा टावूâन दिलेली आहे. रस, ध्वनि, रिति, वक्रोक्ति इत्यादी सिद्धांतांचा वापर करून आपण समीक्षा करणे सोडून दिलेले आहे. त्यासाठी शरच्चंद्र मुक्तिबोध, रा. भा. पाटणकर इत्यादी ज्येष्ठ आणि व्यासंगी समीक्षकांनी त्यांची-त्यांची म्हणून काही कारणेही दिलेली आहेत.
२) सुरुवातीला मराठी समीक्षकांनी स्वत:ची समीक्षा उभी करताना, समीक्षालेखन करताना सौंदर्यशास्त्र (Aesthetics) या पाश्चात्त्य ज्ञानशाखेतील सिद्धांतांचा, संज्ञांचा आणि समीक्षापद्धतींचा आधार घेतल्याचे दिसून येते. काही प्रमाणात या सिद्धांतांचे, संज्ञांचे आणि समीक्षापद्धतींचे भारतीयीकरण किंवा अजून संक्षेप करायचे म्हटले तर मराठीकरण करण्याचा प्रयत्न केला.
परंतु असे करत असताना अनेकदा मूळ संज्ञा आणि सिद्धान्त पुरेशा नीट समजून न घेताच त्यांचा वापर केल्याचे दिसते. तसेच इतर अनेक विद्याशाखांतील त्या-त्या काळातील चलनात असलेल्या संज्ञा आणि सिद्धान्त हे वाङ्मयीन समीक्षेच्या क्षेत्रात वापरले गेले. उदाहरणार्थ Semiotics (चिन्हमीमांसा) ही भाषाशास्त्रातली ज्ञानशाखा आहे, सौंदर्यशास्त्रातली नव्हे. त्यामुळे तिचा वापर करून समीक्षालेखन करायचे तर त्या लेखनाला काही मर्यादा येतात, हे भान सतत ठेवावे लागते. असाच प्रकार हा अस्तित्ववाद आणि सध्या चलनात असलेल्या ‘आधुनिकोत्तर’ (Postmodern) आणि ‘सत्योत्तर’ (Post-truth) या संज्ञा वापरताना घडताना दिसतो.
पैकी आधुनिकोत्तर या संज्ञेचा आपण अगदीच संक्षेपात परामर्श घेऊ. एकतर पोस्टमॉडर्न ही विसाव्या शतकाच्या मध्यावर जन्माला आलेली एक व्यापक चळवळ होती जिचा सढळ वावर आणि वापर तत्त्वज्ञान, कला, स्थापत्यशास्त्र, समीक्षा इत्यादी सर्वच क्षेत्रांत करण्यात आला. या शब्दाचा वापर एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस काही तत्त्वज्ञ, कलावंतांनी केल्याचे दाखवता येते. तसेच १९४०च्या सुमारास Jorge Luis Borges व काही इतर कलावंतांच्या कलाकृतींतून आधुनिकोत्तर चळवळीची काही वैशिष्ट्ये दाखवता येतात, असे काही जाणकार सांगतात. परंतु या चळवळीने आधुनिक म्हणून ओळखल्या गेलेल्या विचारव्यूहापेक्षा वेगळा असा विचारव्यूह जोरकसपणे मांडायला सुरुवात केली ती १९५०च्या सुमारास आणि तिला महत्त्व प्राप्त व्हायला लागले ते १९६० नंतर. ज्या तत्त्वज्ञ, विचारवंत मंडळींची नावे या चळवळीशी जोडून दाखवता येतात, ते आहेत – Jean Baudrilard, Giles Deleuze, jacques Derrida, Michel Foucault, Pierre-Felix Guattari, Fredric Jameson, Emanuel Levinas, Jean Francois Lyotard and Slavoj Zizek. पैकी ज्यांच्या नावांचा उल्लेख मराठी समीक्षेत केला जातो ते आहेत jacques Derrida, Michel Foucault, Fredric Jameson आणि क्वचितच पण कधीतरी उल्लेख होतो तो Slavoj Zizek यांचा. एक वाचक म्हणून मी सुद्धा Jean Baudrilard, Giles Deleuze, Pierre-Felix Guattari आणि Jean Francois Lyotard यांचा एक शब्दही वाचलेला नाही. परंतु कुण्या अभ्यासकाला/ समीक्षकाला ‘आधुनिकोत्तर’ हा शब्द जरी वापरायचा असेल तर त्या अभ्यासकाने/ समीक्षकाने किमान jacques Derrida, Michel Foucault, Fredric Jameson, Slavoj Zizek या तत्त्वज्ञ/ विचारवंतांचे मूलभूत लिखाण वाचलेले आणि समजून घेतलेले असणे गरजेचे नाही काय? जुन्या पिढीतील दोन-चार आणि नव्या पिढीतील दोन-चार अगदी हातावर मोजता येतील अशा समीक्षकांचा अपवाद वगळता किती समीक्षकांनी वरील मंडळींचे लिखाण वाचलेले आणि समजून घेतले आहे, हे ज्यांचे त्यांनी ठरवून घ्यावे.
या आधुनिकोत्तर विचारव्यूहाची काही ढोबळ पण ठळक वैशिष्ट्ये लक्षात घेऊ या.
अ) ‘निखळ/अंतिम सत्य’, ‘वैज्ञानिक सत्य’ किंवा ‘ऐतिहासिक सत्य’ असेही काही नसते. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टी मानतात आणि त्यांनाच ते ज्ञान म्हणतात. म्हणून एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला त्याचे/तिचे तथाकथित ज्ञान स्वीकारण्यास बाध्य करू नये.
आ) वस्तुनिष्ठ ज्ञान (Objective Knowledge) असे काहीही नसते. आपण ज्याला ज्ञान म्हणतो ते निर्माण केले जाते, त्याचा शोध घेतला जात नाही (जे अस्तित्वात असते त्याचा शोध घेतला जातो, असे मानले तर ज्ञान अस्तित्वात नसते ते निर्माण केले जाते, असा याचा अर्थ घ्यायचा.)
इ) आधुनिक काळात (म्हणजे साधारणपणे सतराव्या शतकापासून ते एकोणीसाव्या शतकापर्यंत) असे मानले जायचे की ज्ञानाने, विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने नव्या मानवाचा विकास होईल. परंतु औद्योगिक क्रांतीने व त्यानंतरच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित बदलांनी जसा काही घटकांचा विकास झाला तसा अनेक घटकांचा झाला नाही किंबहुना त्यांचे नुकसानच झाले.
ई) आधुनिकोत्तरतेचा विचारव्यूह हा श्रद्धा, विश्वास यांचा पाया नाकारून एका व्यापक संशयाच्या पायावर उभा केलेला विचारव्यूह आहे.
उ) ‘विवेक’ आणि ‘तर्क’ या वैश्विक पातळीवर वापरण्यायोग्य गोष्टी नव्हेत.
ऊ) ‘मानवी स्वभाव’ (Human Nature) नावाची गोष्ट अस्तित्वात नसते. मानवी आचार (Human Behaviour) आणि माणसाचे मानस (Human Psychology) या सामाजिक, राजकीय, आर्थिक या बाह्य संदर्भानी निर्माण व नियंत्रित होतात.
ऋ) तत्त्वज्ञान आणि साहित्याच्या संदर्भात हा विचारव्यूह असे मानतो की, कोणतेही ‘महाकथन’ (Grand Narrative) हे मुळातच भ्रामक असते. या संदर्भात सत्य, ईश्वर, धर्म, अंतिम ज्ञान इत्यादींना महाकथने म्हणता येते.
वरील तत्त्वज्ञ/विचारवंतांच्या विचारांची ओळख, आकलन आणि त्याआधारे आपण वर वाचलेल्या काही व्यापक पण तरीही सैलसर निकषांच्या आधारे कोणत्याही अभ्यासकापुढे/समीक्षकापुढे दोन प्रश्न उपस्थित व्हायला हवेत.
१) आपण ज्या वाङ्मयीन आणि भाषिक पर्यावरणात श्वास घेतो त्या पर्यावरणाला आपण आधुनिकोत्तर समाजाचे पर्यावरण म्हणू शकतो काय?
२) ज्या-ज्या कथा, कादंबऱ्या, कविता आपण आधुनिकोत्तर साहित्य या कोटीत (Category) वर्ग करतो त्यांना वरील लक्षणे, वैशिष्ट्ये लावून बघता त्यापैकी किती साहित्यकृतींना आपण खरोखर आधुनिकोत्तर म्हणू शकू?
या एका उदाहरणावरून आपल्या हे लक्षात येईल की, खोलात जाऊन चिकित्सा केली तर ज्या पाश्चात्त्य संज्ञा, संकल्पना आणि सिद्धांतांचा मराठी समीक्षेत वापर केला जातो तो मोठ्या प्रमाणात अपुऱ्या आकलनावर आधारित असतो. त्यामुळे या पाश्चात्त्य संज्ञा, संकल्पना आणि सिद्धांतांच्या आधारे केले गेलेले वर्गीकरण हे सदोष स्वरूपाचे आहे, असे म्हणता येईल.
आता आपण आपल्या काही देशी वर्गीकरणांकडे वळू या. उदाहरणार्थ, शहरी, ग्रामीण, जनवादी, इत्यादी इत्यादी.
या प्रकारची वर्गीकरणे तर सरळसरळ मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रातील राजकारणाच्या गरजेतून निर्माण झालेली वर्गीकरणे आहेत. उदाहरणार्थ, शहरी किंवा ग्रामीण साहित्य असे वर्गीकरण करताना दोन गोष्टी गृहीत धरल्या जातात असे दिसते.
१. त्या साहित्याच्या निर्मितीचे स्थान व त्या साहित्याचा निर्माता म्हणजे लेखक किंवा कवी याचे भौगोलिक स्थान.
२. वरचा निकष पक्का असला तरी नावापुरता त्या साहित्याच्या निर्मितीमागच्या सर्जक प्रेरणांचे मूळ हे ग्रामीण जीवनात आहे की शहरी यावरून साहित्याचे वर्गीकरण शहरी किंवा ग्रामीण, असे केले जाते. या ठिकाणी ग्रामीण जीवनातली मूल्यव्यवस्था व शहरी जीवनातली मूल्यव्यवस्था यांत गुणात्मक आणि लक्षणीय फरक असतो, असे गृहीत धरले जाते.
आजघडीला महाराष्ट्राचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त शहरीकरण झालेले आहे. संपादक सुचवतात तशी शहरं गावात घुसलेली दिसतात. शहरीकरणाचे आणि जागतिकीकरणाचे लाभ जरी ग्रामीण भागांपर्यंत पोचत नसले तरी त्याचे दुष्परिणाम मात्र ग्रामीण जीवनावर खोलवर होऊ लागले आहेत. आंतरजालाच्या (internet) च्या अकल्पनीय विस्तारामुळे शहरी आणि ग्रामीण जीवनावर काही वाईट परिणाम झालेले दिसतात. याशिवाय हे आक्रमण होण्यापूर्वीही शहरी आणि ग्रामीण साहित्यनिर्मितीच्या मागे उभ्या असलेल्या मूल्यव्यवस्थांमध्ये फारसा फरक होता, असे नाही. ज्यांना रूढार्थाने शहरी साहित्यिक म्हटले जाते त्यापैकी बहुतेकांचे ग्रामीण जीवनाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नाते आहेच. आर्थिकदृष्ट्या बहुसंख्य मराठी साहित्यिक हे अजूनही कनिष्ठ किंवा मध्यम-मध्यम वर्गातून येतात. उच्च-मध्यम वर्गातून किंवा उच्च वर्गातून येणाऱ्या साहित्यिकांची संख्या नगण्यच आहे. त्यामुळे त्यांच्या जाणिवा आणि मूल्यव्यवस्था यादेखील कनिष्ठ किंवा मध्यम-मध्यम वर्गाच्याच आहेत.
जात, धर्म, समाज, सत्य, सत्याचा शोध, आत्मशोध, क्रांती, सामाजिक बदल, मानवी समाजाचे कल्याण, इत्यादी महाकथने मराठी कवी लेखकांच्या मनात आणि मानसात कायम घर करून बसलेली असतात. त्यामुळे हा शहरी व ग्रामीण वर्गीकरणाचा भेद अत्यंत वरवरचा आहे. ग्रामीण जीवनाचे तपशील कथा, कादंबरी व कवितेत आले तर ते साहित्य ग्रामीण आणि शहरी जीवनाचे तपशील आले तर ते शहरी असे आणि इतके हे ढोबळ वर्गीकरण असल्याचे जाणवते.
या कारणांमुळेच की काय पण अवाङ्मयीन निकषांवर आधारित वर्गीकरणे उदाहरणार्थ जनवादी साहित्य, अस्तित्ववादी साहित्य, ग्रामीण साहित्य, आधुनिकोत्तर साहित्य इत्यादी कोटी एकतर फार काळ टिकल्या नाहीत किंवा टिकण्याची शक्यता नाही.
मुळात भारतीय आणि पाश्चात्त्य साहित्यशास्त्रांच्या अभ्यासाच्या परंपरेत वाङ्मयीन निकषांच्या आधारावर वर्गीकरण करण्याची सोय उपलब्ध आहे. ती बहुसंख्य मंडळींना जुनाट आणि पारंपरिक वाटू शकते. परंतु ते वर्गीकरण अधिक वाङ्मयीन व दीर्घकालीन असण्याची शक्यता असते.
अवाङ्मयीनच परंतु अपरिवर्तनीय कोटी – दलित साहित्य
या सर्व अवाङ्मयीन निकषांवर आधारित वर्गीकरणात एक कोटी (Category) अशी आहे की जी अपरिवर्तनीय आहे आणि ती म्हणजे दलित साहित्य. भारतातच नव्हे तर भारताबाहेर मराठी साहित्यातील दोन गोष्टींबद्दल कमालीचे आकर्षण जाणवते आणि त्या दोन गोष्टी आहेत – मराठी नाटक आणि दलित साहित्य. वादळासारख्या मराठी साहित्यात अवतरीत झालेल्या दलित आत्मकथनांनी आणि नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, इत्यादींच्या कवितांनी स्वत:चे एक स्वतंत्र आणि अढळ स्थान मराठी साहित्यात निर्माण केलेले आहे.
हे स्थान आता बदलता येणे शक्य नाही, परंतु काही गोष्टींचे निराकरण केल्याशिवाय सध्या थिजलेला हा प्रवाह पुन्हा पाहिल्यासारखा प्रवाहित होणे कठीण वाटते. त्या गोष्टी आहेत –
१) दलित साहित्याची व्याख्या करणे अजूनही बाकी आहे.
२) साहित्याच्या मुळाशी जन्माने प्राप्त होणारे दलितत्व असावे की साहित्यत्व याचा निर्णय घ्यावा लागेल.
३) दलित साहित्यासाठी वेगळे सौंदर्यशास्त्र/साहित्यशास्त्र असावे म्हणजे काय, याची अभ्यासपूर्ण मांडणी गरजेची आहे (शरणकुमार लिंबाळे आणि हिन्दी भाषेतील समीक्षक ओमप्रकाश वाल्मीकी यांनी लिहिलेली या विषयावरची पुस्तके काहीही असू शकतात, पण सौंदर्यशास्त्रावर लिहिलेली पुस्तके असू शकत नाहीत.).
कशी असावी समीक्षा?
(या विषयावर स्वतंत्र लेखन आणि त्यावर स्वतंत्र चर्चा व्हायला हवी.)
अलीकडेच ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी एके ठिकाणी मराठी समीक्षा ही अजून बाल्यावस्थेतच आहे असे एक विधान केले होते. मराठी समीक्षेच्या क्षेत्रात काम करणार्यांनी आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून हे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे, अशी स्थिती आहे. गेल्या काही दशकांत काही ज्येष्ठ समीक्षकांचा अपवाद वगळता सैद्धांतिक समीक्षेकडे मराठी भाषेत संपूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे, ही वस्तुस्थिती आहे. अपवाद वगळता, बहुतेक सगळा समीक्षा व्यवहार हा परिचये, परीक्षणे, प्रस्तावना आणि पाठराखण या चार प्रकारांत घडत असलेला उपयोजित समीक्षेचा प्रकार आहे. जुन्या सिद्धांतांची चिकित्सा व नव्या सिद्धांतांची मांडणी या आघाडीवर नीरव शांतता आहे. आंतरविद्याशाखीय (Interdisciplinary) समीक्षेची गरज असल्याचे बहुतेक समीक्षक मान्य करतात. परंतु तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी विद्याशाखांतील अद्ययावत ज्ञानाचा व महितीचा वापर करून कितीशी समीक्षा लिहिली जाते, हे एकदा प्रामाणिकपणे तपासण्याची गरज आहे. जागतिकीकरण, शहरीकरण, भांडवलशाहीचे एकविसाव्या शतकातील रूप व व्याप्ती या गोष्टींबद्दल व त्यांच्या परिणामांबद्दल मराठी समीक्षेतला उल्लेख हा मोठ्या प्रमाणावर केवळ शाब्दिक स्तरावर होतो. या शब्दांचा आशय समीक्षकांना खरोखर पोचला आहे का याबद्दल शंका आहे. भांडवलशाहीच्या नव्या अवताराचे परिणाम जगातल्या सर्व देशांच्या सर्व नागरिकांच्या जीवनावर मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणताहेत. याशिवाय जे वैज्ञानिक व तंत्रज्ञानात्मक बदल जगात घडून येत आहेत व ज्या गतीने ते यापुढे घडून येणार आहेत त्या बदलांनी केवळ साहित्यच नव्हे तर एकूणच मानवी जीवनात काही नवे तत्त्वज्ञानात्मक व नैतिक स्वरूपाचे प्रश्न निर्माण होणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता व त्यातून जन्माला येत असलेली व येणार असलेली कार्य-संस्कृती या जगातील बहुसंख्य माणसांना एक तर बेरोजगार करून टाकेल किंवा सरकारी अनुदानावर जगणारी, दुय्यम नागरिकत्व स्वीकारलेली अनुत्पादक मानवजात निर्माण करेल. ही काही धोक्याची सूचना नव्हे तर ते आपल्या डोळ्यासमोर आकार घेत असलेले वास्तव आहे.
समीक्षेला (केवळ मराठी नव्हे) येणारे दिवस कठीण असणार आहे. एकेकट्या व्यक्तीने वर्षानुवर्षे अभ्यास करून एखादा ग्रंथ सिद्ध करण्याचा काळ हा पुढे इतिहास ठरणार आहे. यापुढे संस्थात्मक संरचनांची निर्मिती करून समीक्षकांच्या समूहांना एकत्र येऊन कला व साहित्याच्या समीक्षेच्या सैद्धांतिक बाजूचा गांभीर्याने विचार करावा लागेल. इतिहासातदेखील जर्मनीतल्य फ्रँकफ्रूट स्कूल, रशियन व चेकोस्लोवाकियन रूपवादी चळवळींचा इतिहास बघता या प्रकारच्या प्रयोगांतून काही मूलभूत स्वरूपाचे व दीर्घकाळ टिकणारे काम निर्माण होऊ शकते.