Home दिवाळी 2021ओपिनियन ओपिनियन- प्रमोद मुनघाटे

ओपिनियन- प्रमोद मुनघाटे

मराठीत समीक्षा खरेच अस्तित्वात आहे का, इथपासून मराठी समीक्षेत स्वत:चे असे काय आहे, इथपर्यंत प्रश्न सातत्याने विचारले जातात. त्यात तथ्य नाही असे नाही. एका बाजूला मराठीत सैद्धांतिक समीक्षेचा खच आहे. अक्षरश: डोंगर रचले गेले आहेत. त्यात सौंदर्यशास्त्राचाच अधिक भरणा. साहित्यशास्त्रीय समीक्षा सिद्धांताचा अर्धाअधिक खच विद्यापीठीय अभ्यासक्रमाभिमुख असा आहे. उपयोजित समीक्षेबद्दल लेखकांची तक्रारही वावगी नाही. शाळकरी रसग्रहणापासून पाश्चात्त्य समीक्षेच्या फूटपट्ट्या लावून मराठी साहित्याची उलटतपासणी अगदी सरधोपट पद्धतीने झाली आहे. अर्थात हे ढोबळ निरीक्षण, कारण या सगळ्याला अपवाद आहेतच.

मुद्दा सैद्धांतिक समीक्षेचा असो असो की उपयोजित समीक्षेचा; दोन प्रश्न निर्माण होतात: आजवरच्या एकूण मराठी समीक्षा व्यवहारात स्वत:चे ‘मराठी’ असे काय आहे? आणि दुसरा, मराठीतील समकालीन गद्य-पद्य लेखनाला मराठी समीक्षा कशी सामोरी जाते, ती त्या साहित्याला न्याय देऊ शकेल अशी मुळात आहे का?

यातही ‘मराठी’ म्हणजे कोणते? हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो. मराठी भाषक लोकांचे एकापेक्षा अनेक समांतर समूह अस्तित्वात असतात. या प्रत्येक भाषिक समूहाचे इतिहास आणि भूगोल वेगवेगळे असतात. युरोपातील बहुतांश भाषिक समूहात असे आढळत नाही. लहान लहान भूखंडापुरत्या लहान लहान भाषा-बोली तिकडे आहेतच. त्यांची सरमिसळ आहेच. पण एकाच भूखंडावर अनेक धर्म, अनेक वर्ण, अनेक जाती-जमाती, भटके आणि गरीब-श्रीमंत, त्यांच्या स्वतंत्र संस्कृतींसह नांदत असल्याचे दृश्य भारतात अधिक आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर त्यातून दलित, ग्रामीण, प्रादेशिक, आदिवासी, भटक्या-विमुक्तांचे साहित्य असे कप्पे निर्माण होत असतात. १९६० नंतर त्या त्या समूहांच्या स्वतंत्र सामाजिक अस्तित्वाच्या जाणिवा निर्माण झाल्याचे चित्र आशादायक होते. साहित्यकृतीच्या भाषिक निर्मितीत आणि रचनाबंधात सेंद्रिय एकात्मता पाहिजे ही अपेक्षा ठीक आहे, पण या पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक मानवसमूह एकाच साच्यातून बाहेर पडलेल्या असाव्यात ही अपेक्षा चुकीची आहे.

मी ‘मराठी’ म्हणतो तेव्हा मला हे अपेक्षित असते. मराठीचा ‘वर्ल्ड व्ह्यू’ हा मूल्यात्मक असावा. पण तपशिलात तो ग्रामीण, प्रादेशिक, आदिवासी, भटक्या-विमुक्त असाच असणार आहे. आज महाराष्ट्रातील कोणत्याही खेड्या-पाड्यातही कोका-कोला आणि कॅडबरी मिळू शकतात हे खरे आहे. पण त्यामुळे तेथील लोक जागतिकीकरणाचे वाटेकरी ठरतात हे खरे नाही. ते जागतिकीकरणाच्या शोषण व्यवस्थेचे बळी ठरतात हेच खरे आहे. परंतु साहित्य कोणत्याही शोषण व्यवस्थेच्या विरोधात असते, ते मूल्यात्मक पातळीवर. लेखकाच्या अनुभवाची अभिव्यक्ता होत असताना जीवनाचे चित्रण कोणत्या तरी भौगोलिक संदर्भात असते. ते जीवनचित्रण काल्पनिक असले किंवा वास्तवाशी समांतर असले किंवा Fantacy च्या स्वरूपात असले तरी त्याचे अक्षांश-रेखांश कोणत्या तरी सांस्कृतिक बिंदूशी निगडित असतात. या सांस्कृतिक बिंदूचे वर्णन आणि वर्गीकरण दलित, ग्रामीण, प्रादेशिक, आदिवासी, भटके-विमुक्त असे केले तर ते महाविद्यालयीन पातळीवरचे सुलभीकरण समजू नये.

समकालीन साहित्यनिर्मितीकडे पाहताना ‘जागतिकीकरणाचा वरवंटा’ हे एकच समान सूत्र का मानायचे? त्या पलीकडे जीवन नाही का? मुळात मानवी जीवनाला कितीतरी मिती असू शकतात, हे गणित आणि विज्ञानाच्या आधी साहित्यातच वर्णन केले जाऊ शकते, तसे केले गेलेही आहे. जागतिकीकरणाचे आत्मतत्त्व असलेली बाजार व्यवस्था पृथ्वीला पुरून उरली आहेच. त्यात दुमत नाही. पण एवूâणच मानवी संस्कृतीच्या प्रवासात उत्क्रांत झालेली मानवी प्रज्ञा आणि ज्ञानलालसा बाजार संस्कृतीला पुरून उरणारी असू शकते, या शक्यतेला आपण का नाकारायचे, असा प्रश्न पडतो.

जागतिकीकरणाचे एक साधन किंवा माध्यम असलेली ‘सायबर संस्कृती’ गेल्या तीन तपाहून अधिक काळापासून मानवी बुद्धीने स्वीकारली आहे. त्याही संस्कृतीचा एक आविष्कार मराठी कवितेने पाहिला. कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या प्रतिमांमधून जीवनाला वेढलेली थंडगार संवेदनहीनता आणि मूल्यशून्यता ताकदीने व्यक्त झाली. एवूâण मानवी व्यवहारांचे बाजारीकारण झाले. विव्रेâता आणि ग्राहक या नात्यातील बाजारमूल्य हेच वेंâद्रस्थानी आले, हे खरेच. पण त्याहीपलीकडे मानवी संवेदना आणि प्रज्ञा अस्तित्वात असू शकते, हे पुढच्या काळात आलेल्या मराठी साहित्याने सिद्ध केलेच. सायबर संस्कृतीमध्ये उदयास आलेल्या अभिव्यक्तीच्या नव्या शक्यता यांचा पुरेपूर सर्जनशील वापर मराठीतील समांतर लेखक कवींनी ताकदीने केला आहे. तथाकथित मुख्य प्रवाहातील लेखकांपेक्षा या समांतर लेखक-कवींनी केलेल्या निर्मितीचा वेग प्रचंड होता. पण सायबर संस्कृतीच्या परिभाषेचे व्यंग्यात्मक रूप उभी करणारी ही निर्मिती त्याच वेगाने लयास गेली. कदाचित लेखक-कवींच्या पारंपरिक वाङ्मयीन व्यवहाराला सायबर संस्कृतीने एक तर पोटात घेतले, त्यामुळे ती जाणीवच विरघळून गेली असावी किंवा सायबर संस्कृतीचा वरवंटाच इतका निष्ठुर आणि व्रूâर असेल की मराठीतील अशा जाणिवांचे साहित्य लवकरच संदर्भहीन झाले असावे. १९९० ते २००० मध्ये आलेल्या अशा प्रकारच्या समांतर कवितासंग्रहांपैकी आज किती आपल्या आठवणीत आहेत याचा विचार केला पाहिजे.

या उलट फेसबुकादी समाजमाध्यमांच्या फेसाळत्या लाटांवर स्वार झालेली, चमचमत्या बाजारमूल्यांना बळी पडलेली उठवळ निर्मिती मराठी समाजमनाच्या केंद्रस्थानी आली. तसेही मूल्यवान विचार असोत की साहित्यनिर्मिती ही व्यापक समाजव्यापी कधीच नसते. पण वल्र्ड-व्ह्यूचा दिमाख मिरवणारी वाङ्मयीन प्रतिभा तिसऱ्या जगातील एखाद्या देशाच्या एखाद्या हॉटेलमधील  खोलीच्या बाहेर कधी आलीच नाही. त्यामुळे अशा प्रतिभेचे सूक्ष्म झरे एकूण समकालीन मराठी साहित्याच्या व्यवहारात झिरपण्याची जी शक्यता होती, ती कधीचीच मावळली.

साहित्यनिर्मिती आधी आणि नंतर तिची समीक्षा असा क्रम असतो. एखादा नवीन प्रवाह स्थिर होऊ लागला की त्या प्रवाहाची समीक्षा अपेक्षित असते. सर्जनशील साहित्याच्या स्थिर झालेल्या प्रवाहातून उद्भवणारी नवी सौंदर्यमूल्ये, शैलीविशेष आणि जीवनदर्शनातून प्रत्ययास येणारी जीवनमूल्ये या गोष्टीही एखाद्या नवीन ज्ञानशाखेसारख्या असतात. अशा प्रवाहांचे नेतृत्व करणारी एखादी साहित्यकृतीही असू शकते. किंवा स्वतंत्रपणे एकच मौलिक कलाकृतीही समर्थ असू शकते. भौतिकशास्त्रप्रणीत ज्ञानशाखा जशा तर्क व अनुभव सिद्ध असतात, तशा प्रतिभावंत लेखक-कवींच्या कला-साहित्यातून निर्माण झालेल्या ज्ञानशाखा अनुभूतीतून निर्माण झालेल्या असतात, असे म्हणता येईल. थोडक्यात सर्जनशील साहित्य हे इतके मौलिक असू शकते, की ते मानवी जीवनाला भौतिक आणि अभौतिक पातळीवर नवे ज्ञान देणारे असते.

अशा सर्जनशील साहित्यनिर्मितीमध्ये लेखकाच्या विवक्षित व्यक्तिमत्त्वाच्या अभिव्यक्तीबरोबरच लेखकाचा काळ, समाज, वर्ग, संस्कृती, तत्त्वज्ञान, लोकमानस आणि लेखकावरील प्रभाव याचाही विचार समीक्षेत केला जातो. गेल्या शंभर वर्षांत तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, भाषाविज्ञान आणि मानवशास्त्रतील नवनव्या प्रमेयांमुळे समीक्षेचा पटसुद्धा असा बहुआयामी होत गेला आहे. या पाश्र्वभूमीवर समकालीन साहित्यातील नवनिर्मिती किती समृद्ध आणि किती स्थिर स्वरूपाची आहे, हे लक्षात घ्यावे लागते. तशी ती नसेल तर एकूणच मराठी सांस्कृतिक व्यवहाराच्या दृष्टीने ती चिंतेची बाब आहे. पण त्याचे खापर समकालीन समीक्षेवर फोडता येणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.

दुसरा मुद्दा मराठी समीक्षा व्यवहारात स्वत:चे ‘मराठी’ असे काय आहे, हा आहे. मराठी समीक्षेच्या प्रवासातील वळणे सर्वश्रुत आहेत. भरतमुनीचे नाट्यशास्त्र, त्यातील रससिद्धांत, ध्वनीसिद्धांत हा संस्कृत काव्यशास्त्रातील ऐवज मराठीने वारसाहक्काने मिळालेल्या ऐवजाप्रमाणे स्वीकारला आहे. विद्यापीठीय अध्ययनातून अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्रही आत्मसात केले आहे. पुढे रूपवाद, जीवनवाद, वास्तववाद, अस्तित्ववाद, आकृतीवाद, आधुनिकवाद, उत्तर आधुनिकवाद, वसाहतवाद, मार्क्सवाद, स्त्रीवाद आणि देशीवाद हेही विचारप्रवाह किंवा या चळवळी मराठी समीक्षा व्यवहारावर प्रभावशाली ठरल्या आहेत. पण त्या सैद्धांतिक पातळीवर अधिक. फार क्वचित उदाहरणे उपयोजित समीक्षेची सांगता येतील. मात्र या चळवळी आणि हे विचारप्रवाह मराठी साहित्यावर पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावातून कलम केल्याप्रमाणे आहेत. भौतिकशास्त्रातील प्रमेयांप्रमाणे त्या सार्वकालिक व भूगोलनिरपेक्ष असू शकत नाहीत. भारतीय किंवा मराठी सांस्कृतिक व्यवहार ज्या देशी मुळांवर पोसला आहे, त्या संदर्भात हे विचारप्रवाह व चळवळी उपऱ्या ठरतात. संस्कृतप्रणीत रसव्यवस्थेच्या आणि मर्ढेकरप्रणीत पाश्चात्त्य आकृतीवादी सौंदर्यविचारांच्या मर्यादा बेडेकर आणि मुक्तिबोधानी सक्षमपणे सांगितल्या. त्यानंतर अनेक मराठी समीक्षकांनी आपले सिद्धांत मांडले आहेत. पण ही सगळी सैद्धांतिक समीक्षा भारतीय किंवा मराठी संस्कृतीनिरपेक्ष आहे. सामाजिक सुधारणा आणि इंग्रजी शिक्षण या गोष्टी वसाहतकाळात आपल्यापर्यंत पोचल्या आहेत, त्या भारतीय समाजाने किती स्वीकारल्या असत्या त्यावर आजही वाद आहेत. त्यामुळे मार्क्सवाद, स्त्रीवाद, अस्तित्ववाद, आधुनिकवाद आणि उत्तरआधुनिकवाद यांच्या खुणा समकालीन साहित्यात शोधताना साक्षेपी भूमिका घ्यावी लागते.

समकालीन सर्जनशील लेखनाला मराठी समीक्षा कशी सामोरी जाते याचा विचार करताना वरील विवेचन लक्षात घ्यावे लागते.

मो. ७७०९०१२०७८ 

The Poetrywala Foundation is envisaged as a discerning and hospitable space in both digital and real-world mode for practitioners and readers of poetry and translation from India.

Copyright @2023  All Right Reserved – Designed and Developed by VR Webtek Solutions

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept