जागतिक दर्जाचं साहित्य म्हणजे मराठीतलं कुठलं साहित्य हा प्रश्न मलाही पडतो. यानंतर माझ्या मनात प्रश्न येतो की, मराठीतलं किती साहित्य इंग्रजीत अनुवादित झालं आहे? त्याशिवाय जागतिक पातळीवर आपलं मराठी साहित्य मान्यता पावणं कठीण आहे. आणि याबाबतीतही मी अनभिज्ञ आहे की कुठली मराठी पुस्तकं आतापर्यंत इंग्रजीत अनुवादित झालेली आहेत. मराठीतील अनेक साहित्यकृती जागतिक पातळीवर मान्यता मिळवू शकतात. मी फक्त काही उदाहरणं किंवा लेखक सांगतो. अगदी जुनी एक कादंबरी हमीद दलवाईची ‘इंधन’ किंवा नंतरची किरण नगरकरांची ‘सात सक्कं त्रेचाळीस’, प्रभाकर पेंढारकरांची ‘रारंगढांग’ किंवा विश्राम बेडेकरांची ‘रणांगण’ किंवा चिं. त्र्यं. खानोलकरांची ‘अजगर’ किंवा पु. शि. रेगे यांची ‘सावित्री’, दीनानाथ मनोहर यांची ‘रोबोट’ अशा या अनेक कादंबर्यांतून येणारे आपले सांस्कृतिक संदर्भ हे अखिल मानवजीतीशी जोडलेले आहेत. त्या संदर्भातले तपशील इतर भाषकांना सहज समजण्यासारखे आहेत. अखिल मानवी जीवनाच्या आवाक्यात आपल्या देशाची, भाषेची मुळं रोवणे याचं भान आपल्या कित्येक लेखकांकडे नाहीय. याबाबतीत विलास सारंग आणि अरुण कोलटकर शिवाय किरण नगरकर यांनी आपल्या साहित्याला जागतिक पातळीवर नेले आहे. पण तशी मान्यता मिळाली आहे का त्यांच्या साहित्याला हे न कळणारं आहे.
असा एक प्रश्न मी स्वत:ला विचारून पाहिला की, पाश्चात्त्य किंवा लॅटिन अमेरिकन, पोर्तुगीज लेखकांचं साहित्य मला का आवडतं. तर पहिलं उत्तर मिळालं की लेखकाच्या भाषेचे प्रवाहीपण आणि त्यामुळे त्याला प्राप्त होणारा वाचनीयतेचा गुण. रॉबर्ट बोलॅनो याची आठशे-नऊशे पानांची कादंबरी मी वाचत राहतो आणि वाचतच जातो. जरी त्यातली संस्कृती त्यातलं विश्व हे मला माहीत असलेल्या विश्वापेक्षा वेगळं असलं तरी. त्यांनी अखिल मानवजीतीशी संवाद साधेल अशा पद्धतीनेच आपल्या देशाचे सांस्कृतिक संदर्भ आणि तपशील कादंबरीत वा कथेत वा कवितेत मांडलेले असतात.
आणखी एक निकष मला असा वाटतो की, पाश्चात्त्य किंवा भारताबाहेरच्या मला आवडलेल्या साहित्याला एक परिमाण तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोणाचे आहे. पृथ्वीच्या पाठीवरच्या प्रत्येक माणसाचे मूलभूत प्रश्न हे कॉमन आहेत. मी कोण आहे, माझं या पृथ्वीवर काय काम आहे. व्यक्तिश: बोलायचं तर मला स्वत:ला तत्त्वज्ञानात्मक दृष्टी असलेल्या लेखकाची पुस्तकं/ साहित्य जास्त आवडतं.
जागतिक भान म्हणजे काय- लेखकाला जागतिक भान असणे गरजेचे आहे. पण जागतिक भान म्हणजे काय? जगाच्या पाठीवरील कुठल्याही माणसाला पडणारे जीवनविषयक मूलभूत प्रश्न लेखकालाही पडणे म्हणजे जागतिक भान असं म्हणता येईल. शिवाय वर म्हटल्याप्रमाणे, अखिल मानवी जीवनाच्या आवाक्यात आपल्या देशाची, भाषेची मुळे रोवणे याचे भान आपल्या कित्येक लेखकांकडे नाहीय.
या सर्व विचारविमर्शातला एक घटक म्हणजे वाचक. बाहेरच्या देशातले वाचक वाचनासाठी कष्ट घेणारे आहेत. मराठीतले वाचक एखाद्या साहित्यकृतीत आलेला आणि त्यांच्यासाठी नवा असलेला संदर्भ शोधण्याचा कंटाळा करतात. खरंतर याबाबतीत मी ठाम काही बोलत नाहीय. आजूबाजूच्या वाचनसंस्कृतीच्या अवलोकनातून मला जाणवलेले एक अस्पष्ट सत्य असेल किंवा नसेल. अभ्यासू वाचक, चांगले वाचक, सुमार वाचक आणि नुसते वाचक असे गट पाडून एक सेन्सस घ्यायला हवे असे वाटते. वाचक हाही घटक या विषयासंदर्भात महत्त्वाचा आहे.