Home August 2021ओपिनियन जागतिक साहित्य म्हणजे काय? – स्वप्निल शेळके

जागतिक साहित्य म्हणजे काय? – स्वप्निल शेळके

जागतिक दर्जाचं साहित्य असं जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा या सबंध विश्वातला कोणताही वाचक त्या साहित्याशी जोडून घेऊ शकला पाहिजे, त्यातल्या जाणिवा, त्यातल्या संवेदना अनुभवू शकला पाहिजे, अशी किमान अपेक्षा त्या साहित्याकडून करत असतो (आता जग म्हणजे केवळ युरोप नव्हे हे एव्हाना सगळ्या जगाला माहीत झालेले आहेच.). कोणताही वाचक, असं म्हणत असताना आपल्या भाषेच्या, प्रदेशाच्या, संस्कृतीच्या पलीकडील घटिताकडे, सामंजस्याने आणि आस्थेने पाहणारा वाचक अभिप्रेत आहे. मुळात साहित्यकृतीचा होणारा परिणाम हा प्रामुख्याने वाचकाच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असतो. वाचकाचा भूतकाळ, वाचकाचा वर्ग, त्याच्या सभोवतालची सामाजिक-राजकीय परिस्थिती इत्यादी बाबी, त्याची रुची आणि त्याची संवेदना घडवण्याचं काम करत असतात.

शिवाय जन्म, मृत्यू, अनुभवांची क्षणभंगुरता यांसारख्या भौतिक अनुभवांपलीकडच्या बाबी समजावून घेण्याची त्याची ओढ, इच्छा, आस्था, तिटकारा याचाही परिणाम साहित्याच्या परिणामावर होतच असतो. त्यामुळे ही सगळी चर्चा, एका उदार आणि आस्था असलेल्या, वाचनावर प्रेम करत असलेल्या, वाचकाला केंद्रस्थानी ठेवून/ गृहीत धरून करावी लागते.

अर्थात हे जग किंवा त्यातली स्थळं ही काही भौगोलिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आणि सभ्यतेच्या दृष्टीने एकजिनसी प्रदेश नाहीत. त्यामुळे बाह्य प्रदेशातील संवेदना अनुभवू शकणं, ही बाब आदिम पातळीवरच्या संवेदनेवर येऊन साधारणत: स्थिरावते. हिंसा, भय, विकार, गंड, प्रेम, आस्था, असूया, लैंगिकता, मानवी निरागसत्व अशा ठरावीक भावनांची यादी त्या आदिम जाणिवा-स्वभावामध्ये आपल्याला करता येऊ शकते. त्यामुळे या आणि अशा भावनांच्या आणि वर्तनाच्या गुंतागुंतीचं प्रकटीकरण ज्या साहित्यातून होतं ते स्थळ आणि काळाच्या भौगोलिक सीमा ओलांडतच असतं आणि त्या अर्थाने ते जागतिक असतंच. 

अर्थात स्थळ, काळ, संदर्भ यांना धूसर करून वैश्विक जाणीव वाचकाच्या ठायी निर्माण करणं हे प्रतिभेचं काम आहे. ते त्या-त्या लेखकाचं कौशल्य आहे, त्याच्या निर्मितीची ती ताकद आहे. कारण तसं नसतं तर जगातल्या सगळ्या भाषांमध्ये रचलेली प्रेमकाव्यं, प्रेमावरच्या कथा-कादंबर्‍या वैश्विक झाल्या असत्या, कारण प्रेम ही तशी सर्वात प्राथमिक वैश्विक भावना आहे. तसे होत नाही. कारण त्या भावनेला ज्या रचितातून आकळू पाहिलेले असते त्या रचिताच्या बांधणीमागची कलावंताची प्रतिभा तिथे निर्णायक ठरत असते.

या प्रक्रियेत भाषेची भूमिका महत्त्वाची आहे. साहित्यनिर्मितीचं साधन भाषा आहे. भाषेला केवळ लिपी नसते, तिला तिच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा आवाजही असतो. यांमुळे कुठलंही भाषांतर हे मूळ संहितेपेक्षा काकणभर दुय्यमच असतं. त्यामुळे एखादी कलाकृती खर्‍या अर्थाने जगभरच्या वाचकांच्या अनुभूतीला केंद्रस्थानी ठेवून, जागतिक होऊ शकते का? हा गंभीरपणे विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्यामुळे जागतिक, वैश्विक यांसारख्या संज्ञा वापरताना हे भान असणं गरजेचं आहे.

पुन्हा यात आणखी एक मुद्दा येतो की कोण ठरवतं की, हे साहित्य जागतिक आहे आणि हे नाही (who decides?) कारण साहित्याचं मूल्यमापन आणि अभ्यास, या अशा संज्ञांच्या कसोटीवर करणं, ही आधुनिक सभ्यतेत निर्माण झालेली बाब आहे. जिला विशेषत: आधुनिक अकादमिक शिक्षणाचा संदर्भ आहे. 

यात आणखी एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ठरवून जागतिक साहित्य निर्माण करता येतं का? आंतरराष्ट्रीय आशय आणि विषय साहित्याला जागतिक करू शकतो का? तर एकास एक कसोटीवर या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. एखाद्या मराठी लेखकानं

पॅरिसमध्ये घडवलेली सपाट कथा म्हणजेही जागतिक साहित्य नाही.

जागतिक साहित्याकरिताचा ‘एकच’ निकष काढायचा असेल तर तो निर्मितीच्या प्रक्रियेला केंद्रस्थानी ठेवून काढावा लागेल. या जगातल्या कुठल्याही लेखकाने त्याच्या मनुष्यत्वाशी प्रामाणिक राहून, कलावंताच्या ठायी असणारा धीर, धैर्य यांच्याशी बांधिलकी राखत जे काही निर्माण केले, ते जागतिक होत असते. अर्थात मनुष्यत्वाशी प्रामाणिक राहून, असे म्हणत असताना सापेक्षता गृहीत धरलेली आहे आणि ती वैश्विक पातळीवर माणूस म्हणून अचर मूल्यांशी बांधिलकी सांगणारी आहे. अशी निर्मिती करताना घटना, घटितं, व्यक्ती, स्थळं ही स्थानिक असू शकतात; सांस्कृतिकदृष्ट्या स्पष्टपणे उर्वरित जगापासून पूर्ण तुटलेली असू शकतात, परंतु त्यांच्या निर्मितीमागे जे सुकाणू आहे (Driving force) ते लेखकाच्या आतल्या अतार्किक निर्मिती प्रक्रियेशी बांधिलकी राखणारं असेल तर ते स्थळकाळाच्या सीमा संवेदनांच्या पातळीवर भेदू शकतं (याचं उत्कृष्ट उदाहरण चिनुआ अचेबेचं ‘थिंग्स फॉल अपार्ट’ आहे.). थोडक्यात स्वत:च्या प्रतिभेवर सदसद््विवेकाचा अंमल राखत आणि प्रतिभा आणि मानवी मूल्य यांच्यातील संतुलन साधत निर्माण केलं जाणारं कोणतंही साहित्य, जागतिक साहित्य होऊ शकतं.

आणि हे असं असल्यामुळे साहित्याचा विचार करता, कविता या सर्वाधिक ओल्या (Liquid) आकृतिबंधात ही शक्यता जास्तीत जास्त असते. कारण संदर्भ पुसून संवेदना जागवण्याची अमूर्तता निर्माण करण्याचे सामर्थ्य अस्सल कवितेत असते. या निकषांवर मराठीत नावं घ्यावीत अशा अनेक कलाकृती मिळतील की ज्यात वर म्हटल्याप्रमाणे संवेदना ‘चमकून’ जातात; किंबहुना तशा त्या जगातल्या कोणत्याही भाषेत मिळतील.

(शब्दमर्यादेचं बंधन असल्याने) काही मोजक्याच ओळी उदाहरणादाखल देता येतील, ज्यात अशा प्रकारची वैश्विक संवेदना आढळू शकते,

‘…क्या कभी तुमने उसे बताया है की

तुम्हारी जांघ में जो दर्द है

उसका इलाज

कम्युनिस्ट मॅनिफेस्टो है’

– प्रकाश जाधव

(या चार ओळींमध्ये वेदनेतून मुक्तीचा मार्ग वर्गसंघर्ष आहे हे काव्यात्म पद्धतीने सूचित होते, जे मार्क्स माहीत असणार्‍या आणि वेदना पाचवीला पूजलेल्या कुठल्याही भूगोलात तितक्याच तीव्र संवेदनेने अनुभवले जाऊच शकते.)

अशाच नामदेव ढसाळांच्या या ओळी,

‘…वाटलं भान्चोदचा कोठल्यातरी तीक्ष्ण हत्याराने खून

करावा पण सालं जवळ दहा पैशाचं ब्लेडदेखील नव्हतं

भान्चोदनी कुत्र्यासारखा ग्लास पुढे केला

मीही डुकरासारखा पीत राहिलो

बाहेर आलो तेव्हा मला जाणवलं की

आपण फक्त कवी आहोत्ा नि भिकारी…’

(यात व्यवस्था, तिचे मालक यांच्याविषयीचा राग (Angst) आहे आणि कलावंत म्हणून आपण व्यावहारिक जगात कुणीच नाही किंबहुना लाचार आहोत, ही भावना वैश्विकच आहे.)

किंवा सदानंद रेगेंच्या ओळी घ्या,

‘बायकोस म्हटलं :

हा अ‍ॅरिस्टॉटल तुला;

आठबारा आणे का होईनात,

पण कायमचे येत राहतील…

यापुढे ज्या कविता 

लिहिणार नाही

त्या ठेवायच्या ताईच्या बँकेत…

(इथेसुद्धा साहित्य-कला आणि व्यवहार यांच्यात जो पेच आहे तोच येतो,जो जगात कुठेही पोचू शकतो)

हे सगळं झाल्यावर आता थोडंसं ‘जागतिक भान’ या संज्ञेवरही बोलणं गरजेचं आहे. मुळात जागतिक भान ही थोडीशी फसवी संकल्पना आहे. जागतिक घडामोडी किंवा जागतिक संदर्भांचे भान किंवा बहुतांश इंग्रजी साहित्याचे वाचन करून झालेले आकलन असा इथे अर्थ अभिप्रेत असेल तर त्या भानाला अर्थ नाही. ते कृतक आहे.

मुळात साहित्य ही मराठी समूहात विद्यापीठांच्या कह्यात गेलेली गोष्ट झाल्यामुळे सर्जन प्रक्रियेला केंद्रस्थानी ठेवून आकलन करण्याऐवजी आकलनाला प्रमाण मानून निर्मिती करण्याचा विनोदी प्रकार मराठीत पाहायला मिळतो. म्हणजे ठरवून पोस्ट मॉडर्न लिहिणे वगैरेसारखी हास्यास्पद कृत्ये यातूनच घडतात. आणि मग युरोपकेंद्रित परात्मता डोक्यात धरून नीरस आणि गिरवून गिरवून साहित्यनिर्मिती केली जाते. याचा अर्थ परात्मता ही काही युरोपातच असलेली भावना आहे, ती इथे नाहीच असे नाही, आक्षेप तिच्या प्रकटीकरणाच्या उलट्या प्रवासावर आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे! थोडक्यात सर्जनाच्या सार्वभौमत्त्वावर अशा बाह्य संज्ञांनी हुकूमत गाजवता कामा नये, कारण त्या प्रेरणांनी होणारी निर्मिती भ्रष्ट (Corrupt)  होत जाते, याचे भान बाळगणे गरजेचे आहे.

The Poetrywala Foundation is envisaged as a discerning and hospitable space in both digital and real-world mode for practitioners and readers of poetry and translation from India.

Copyright @2023  All Right Reserved – Designed and Developed by VR Webtek Solutions

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept