Home August 2021परस्पेकटीव परस्पेक्टिव अभिव्यक्तिस्वातंत्र्य

परस्पेक्टिव अभिव्यक्तिस्वातंत्र्य

स्वातंत्र्य म्हणजे काय हे आधी समजावून घेऊ. स्वातंत्र्य हा एक अमूर्त (abstraction) पदार्थ आहे; एक संकल्पना. ती अनेक गाष्टींनी ग्रस्त आहे. स्वतंत्र असे काहीच नसते. ‘मी स्वतंत्र आहे’, हे विधान वास्तविक निरर्थक आहे. तुम्ही कधीच स्वतंत्र नसता किंवा तुमच्या आजूबाजूला असणार्‍या अनेक गोष्टी याही स्वतंत्र नसतात. तुमची जात, वर्ण, श्रेणी, लिंगभेद (म्हणजे तुम्ही स्त्रीr आहात का पुरुष आहात?), देश, प्रदेश, सत्ता, ज्या कुटुंबात तुम्ही राहता तेथील सांस्कृतिक चौकट, पर्यावरण, आर्थिक आणि राजकीय व्यवस्था या व अशा अनेक गोष्टी ‘स्वातंत्र्या’वर प्रभाव टाकत असतात. तुम्ही जे जे निर्णय घेत असता त्यावर या अनेक घटकांचा प्रभाव असतो. या सर्व सांस्कृतिक आणि राजकीय पर्यावरणात तुम्ही काही व्यक्त (अभिव्यक्ती) करता, काही बोलता, काही लिहिता, पोशाख कोणता करता? अन्न निवडता, बाजारात जाऊन वस्तू विकत घेता… या व अशा अनेक बाबींवर या अशा अनेक घटकांचा प्रभाव राहतो.

तुमचे व्यक्तित्व हे असे घडत जाते/बर्‍याचदा ते घडवले जाते; रचित होत जाते. म्हणून तुमचे बोलणे, लिहिणे, तुमची कृती ही मूलत: तुमची स्वत:ची नसतेच, ती प्रभावित असते; रचित रचनांतून आकारात असते. तरीही, व्यक्तित्व (individuality) नावाची एक गोष्ट असतेच. परंपरा, रूढ विचार, तेच ते तुडवले गेलेले गुळगुळीत आणि निरर्थक रस्ते, कायदा, सत्ता (राजकीय, धार्मिक), व्यवस्था… अशा अनेक गोष्टींना प्रतिकार, विरोध, कधी कधी बंड केले जाते. याला मार्क्सने द्वंद्व (dialectics) म्हटले आहे. खरंतर यालाच आपण ‘अभिव्यक्ती’ असे म्हणायला हवे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न मला वाटत. ‘मी जेवलो, मी झोपलो, मी ऑफिसला जाऊन आलो, मी दवाखान्यात जाऊन डॉक्टरकडे तब्येत दाखवून आलो, उद्या बघू या…’ ही सारी विधाने निरर्थक आहेत. याला आपण ‘अभिव्यक्ती’ असे म्हणू शकतो का? पण ‘उद्या’ या विषयावर शेक्सपिअर काय म्हणतो पाहा :

Tomorrow, and tomorrow, and tomorrow,
Creeps in this petty pace from day to day,
To the last syllable of recorded time
(From Macbeth, Act 5 Scene 5)

रोजच्या रहाटगाडग्यातला

येणारा

प्रत्येक दिवस

उद्याचा

उद्या, आणि उद्या, आणि उद्या,

काळाने निश्चित केलेल्या

जगाच्या या क्षुद्र अवकाशात

शेवटच्या निरर्थक शब्दावरून

रांगतोय

(अनु : दीपक बोरगावे)

अभिव्यक्तीचा प्रश्न हा माणसाइतकाच प्राचीन आणि आदिम आहे. माणसाला बोलायला येऊ लागले, लिहायला येऊ लागले, चित्र रंगवायला येऊ लागले, त्याला शिल्पकला अवगत झाली, तो नृत्यू करू लागला तेव्हापासून आजतागायत हा प्रश्न सातत्याने आपल्यासमोर आ वासून उभा आहे. म्हणून, माणूस जे जे काही व्यक्त करू इच्छितो त्या सर्व गोष्टी अभिव्यक्तीचा भाग बनू शकतात/ बनतात. अभिव्यक्तीचा प्रश्न म्हणून अधिक जटिल आणि क्लिष्ट आहे. अनेक व्यक्त होऊ शकणार्‍या/ होणार्‍या गोष्टींचे स्वातंत्र्य म्हणजेच अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. हा प्रश्न अिभव्यक्तीच्या अंगानेच निर्माण होणारा आहे.

अभिव्यक्ती म्हणजे केवळ बोलणे/लिहिणे एवढीच या संकल्पनेची मर्यादा नाही. व्यक्त होण्याचे अनेक मार्ग आहेत/असतात. ध्वनी (बोलणे) आणि चिन्ह (लिहिणे) याचबरोबर चित्र काढणे, चित्र रंगवणे, स्वर आणि शब्दांच्या किंवा संगीतवाद्यांच्या माध्यमातून गाणे म्हणणे, नृत्य, शिल्पकला आदी अनेक गोष्टी या अभिव्यक्त व्यक्तीमध्ये येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीने पोशाख कसा करावा? कोणता करावा? पुरुषाने काय परिधान करावे? स्त्रीrrने काय परिधान करावे? स्त्रीrrने पुरुषासारखा पोशाख केला तर चालेल का?

स्त्रीचा पोशाख काय असावा? हे धर्मसंस्थेने आणि पुरुषसत्तेच्या चौकटीने घालून दिलेले संकेत, स्त्रियांनी कायम पाळावेत ही अपेक्षा असते. युरोपच्या इतिहासात सेन्ट जोन्स या प्रेंâच स्त्रीrrने चर्चसंस्थेला आव्हान दिले होते. सैनिकी पोशाख करून घोड्यावरून प्रवास करून तिने केलेले हे बंड सुसंघटित अशा स्वरूपाचे होते. जोन्सचा पोशाख सैनिकी होता. एखाद्या स्त्रीrrने अशा प्रकारचा पोशाख करावा हे तत्कालीन संस्कृतीला मान्य नव्हते. ती जे काही म्हणत होती ते तत्कालीन धर्मसंस्थेला मान्य नव्हते. त्यांच्या दृष्टीने ते त्यांना हानिकारक होते. शेवटी सेन्ट जोन्सला अटक झाली आणि परत अशा प्रकारचे बंड होता कामा नये, यासाठी समाजात जरब बसली पाहिजे म्हणून सेन्ट जोन्सला एका बाजारपेठेच्या मोठ्या चौकात जाहीररीत्या जाळण्यात आले. खैरलांजी, निर्भया प्रकरण ही आजची ताजी उदाहरणे याच अत्याचाराच्या आवृत्त्या आहेत.

हा लिंगभेद (gender difference) सापेक्ष प्रश्नसुद्धा अभिव्यक्तीचा प्रश्न असतो. विवाहित स्त्रीने कपाळावर कुंकू लावणे (हे योग्य का अयोग्य? कुंकू हे नवर्‍याच्या नावाने स्त्रीने आपल्या कपाळावर लावलेले गुलामीचे चिन्ह, असाही एक याचा एक अर्थ लावता येतो) हे जसे हिंदू संस्कृतीमध्ये आपणाला दिसते, तसे नेमक्या दुसर्‍या संस्कृतीमध्ये ते अनुपस्थित असू शकते. याला संस्कृती विशेष/सापेक्षतेने व्यक्त झालेले चिन्ह असे म्हणता येईल.

किंवा आधुनिक जगामध्ये व्यक्त होण्याचे स्वरूप आणि त्याचा विस्तार इतका व्यापक झाला आहे की, याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. बाबरी मास्जिद पाडल्यानंतर हिंदू मुस्लीम दंगली सुरू झाल्या. एवढेच नव्हे तर त्याचे पडसाद जगभर उमटले. दृव्âश्राव्य माध्यमे, चित्रपट, लघुपट, माहितीपट, व्हिडीओ, व्हॉइस क्लिप्स, वेबिनार, फेसबुक, इन्स्टाग्रामवरील पोस्ट्, विशिष्ट प्रकारची चिन्हे, यांचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर अ‍ॅण्ड्रॉइड क्रांतीनंतर सुरू झाला. याचे जगभर जाळे विणले गेले. खोट्या व्हिडीओज वायरल करून काही विशिष्ट जमातीतील लोकांना टार्गेट करण्यात आले, हा इतिहास तसा ताजाच आहे.

आजही विशेषत: उत्तर भारतामध्ये (यूपी आणि बिहार) स्त्रीने जीन्स पॅण्ट घालू नये, असे संकेत आहेत. त्याबद्दल समाजात नाराजी आहे. शिवसेना या संघटनेने व्हॅलेंटाइन डे हा साजरा करायचा नाही, तो पाश्चात्त्य आहे. पुण्यामध्ये ग्रीटिंगची दुकाने जाळण्यात आली होती. व्हॅलेंटाइनचे ग्रीटिंग्स तरुण/ तरुणींच्या हाती लागू नयेत हा त्या पाठीमागचा उद्देश होता. इथे पोषाखाबरोबरच तुम्ही कोणत्या प्रकारचे मेसेजेस/ ग्रीटिंग्स देता हाही एक महत्त्वाचा (अभिव्यक्तीचा) प्रश्न होतो.

एखादी गोष्ट व्यक्त केली जाऊ नये किंवा तशी करण्यास मज्जाव करणे आणि तरीही ती व्यक्त होत असेल तर ती दडपून टाकणे हा अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा प्रारंभ बिंदू असतो. किंवा ही गोष्ट अगदी उलट्या पद्धतीनेही होऊ शकते. ‘गर्व से कहो हिंदू है!’ असे अ-हिंदू लोकांना उद्देशून जेव्हा म्हटले जाते, तेव्हा अल्पसंख्य अ-हिंदू लोकांमध्ये दहशतीची भावना निर्माण करण्याचा उद्देश असतो का? अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा असाही उपस्थित होऊ शकतो.

अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य म्हणजे, तुम्हाला काही म्हणायचे आहे, तुम्हाला काही म्हणायचे नाही, तुम्ही काही लिहू इच्छिता, तुम्ही काही लिहू इच्छित नाही, तुम्ही मौनात आहात; म्हणजे तुम्हाला काही म्हणायचे आहे, पण ते तुम्ही म्हणत नाही अशा अनेक गोष्टी अभिव्यक्ती किंवा अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य यात येऊ शकतात. अभिव्यक्तीचा प्रश्नाचा परिसर हा असा व्यापक होत जातो.

गुजरातमधील पारुल खक्कर या कवयित्रीचे अगदी ताजे उदाहरण आहे. अलीकडचे, म्हणजे कोविडच्या दुसर्‍या लाटेनंतर गंगा नदीमध्ये वाहणार्‍या प्रेतांचे भयंकर असे चित्र पाहून त्यांनी एक कविता लिहिली. पारुल खक्कर या काही राजकीय कविता लिहिणार्‍यातल्या कवयित्री नाहीत. अगदी साध्या गृहिणी आहेत आणि निसर्ग, प्रेम, सर्वसाधारण घरातल्या गोष्टी

याबद्दल त्या लिहीत असतात. पण ही कविता त्यांची व्हायरल झाली. ती तात्काळ भारतातील दहा भाषांमध्ये अनुवादित झाली आणि सलील त्रिपाठी या ‘न्यूयॉर्क टाईम’च्या पत्रकाराने या

कवितेचा इंग्रजीत अनुवाद केला. भाजप पक्षावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या कवितेतून टीका केली आहे अशा पद्धतीचे वळण या कवितेला मिळाल्यामुळे पक्षाच्या भक्तगणांनी खक्कर यांना टार्गेट करून भयंकर अशा प्रकारचे ट्रोलिंग सुरू केले. खक्कर यांनी आपले फेसबुक अकाऊंट बंद केले. त्यांना १५००० पेक्षा अधिक फेसबुक फॉलोवर्स आहेत. त्यांच्याशी बोलण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही; मौन धारण केले. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे हे अगदी ताजे उदाहरण आहे.

साठोत्तरी काळात आपल्याकडे दलित आत्मकथने मोठ्या प्रमाणात लिहिली गेली. दया पवार आणि लक्ष्मण माने यांच्या आत्मकथनांनी सुरुवातीला हा पाया घालून दिला.  १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. हिंदू धर्माची अभिव्यक्ती त्यांनी नाकारली. ती मानवविरोधी आणि विशेषत: दलितविरोधी आहे, म्हणून ते म्हणाले, ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो; पण हिंदू म्हणून मी मरणार नाही.’ या घटनेचा फार मोठा प्रभाव साठोत्तरी काळावर आपणाला दिसून येतो. दलित समाजाची अस्मिता यामुळे जागी झाली आणि दलितांना स्वत:चा आवाज गवसला; स्वत:ची अभिव्यक्ती सापडली आणि त्यांनी आपल्या जीवनकथा लिहायला सुरुवात केली.

या सर्व रचनांना तत्कालीन प्रस्थापित साहित्य संस्कृतीने मान्यता दिली नव्हती. दलित आणि शोषित समाजाचे प्रभावी चित्रण या आत्मकथनांतून अभिव्यक्त झाल्यामुळे मराठी साहित्य संस्कृतीला जबरदस्त हादरे बसले होते. हे मान्य करण्याची प्रस्थापितांची तयारी नव्हती. प्रागतिक आणि विशेषत: डाव्या विचारांच्या समीक्षकांनी या रचना उचलून धरल्यामुळे पारंपरिक अभिव्यक्तीला धोका निर्माण झाला. आपल्या समाजात किती मोठ्या प्रमाणात अज्ञान, दारिद्र्य, दु:ख, दैना आणि अत्याचार होत आहेत याचे दर्शन या आत्मकथनातून परिणामकारकरीत्या अभिव्यक्त झाले होते. या अभिव्यक्तीला दोन्ही बाजूने विरोध होता. ज्या समाजाचे हे चित्रण होते, त्या समाजातील लोकांनी याला विरोध तर केलाच होता, शिवाय हे खूप अतिशयोक्त आणि दारिद्र्याचे गौरवीकरण आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया प्रस्थापित समीक्षेने दिल्या होत्या.

नंतर अशा प्रकारच्या आत्मकथनाची लाट मराठी साहित्यात प्रसारित झाली. सरकारदरबारी याची नोंद झाली. यांना अनेक पुरस्कार देण्यात आले आणि हा अभिव्यक्तीचा प्रतिरोध काही प्रमाणात कमी झाला/कमी करण्यात आला. पण समाजाची परिस्थिती, शोषितांचे दु:ख, दारिद्र्य, अज्ञान काही संपले नाही. साहित्यनिर्मितीमुळे समाज परिवर्तन होते का, असा एक प्रश्न नेहमी चर्चेला घेतला जातो. वास्तविक पाहता, साहित्य समाज परिवर्तनाला एक जाणीव देते, विधायकता देते किंवा कधी कधी उलट्याही गोष्टी यातून प्रसारित होऊ शकतात/ होत जातात (यासंदर्भात अनेक वादग्रस्त साहित्यनिर्मितीचे संदर्भ देता येऊ शकतील). शोषितांचे दु;ख, दारिद्र्य, अज्ञान संपवण्यासाठी भौतिक परिस्थितीत बदल व्हावा लागतो, अशा प्रकारची सांस्कृतिक पर्यावरणाची निर्मिती व्हावी लागते. यात प्रागतिक आणि शोषितांच्या बाजूने लिहिल्या गेलेल्या साहित्याचा थोडाफार नक्कीच हात लागू शकतो. दलित लेखकांना अनेक पुरस्कार लाभले. समाजामध्ये त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रतिष्ठा वाढावी यासाठी या पुरस्कारांचा नक्कीच हातभार लागला. मात्र, यामुळे दलित लेखकांच्या प्रतिकाराची अभिव्यक्ती काही प्रमाणात सैल झाली/तशी करण्यात आली. अभिव्यक्तीचा परिघावरून केंद्राकडे जाण्याचा हा एक साहजिक असा मार्ग इथे दिसतो.

अभिव्यक्तीच्या प्रश्नांमध्ये डावा आणि उजवा असा काही प्रकार असतो का? मध्यंतरी माझ्या एका मित्राने माझे शेक्सपिअरवरचे एक-दोन लेख वाचून मला कोड्यात टाकणारा एक प्रश्न विचारला होता. तुमचा शेक्सपिअर डावा की उजवा? मला काही क्षण बोलताच येईना. मी म्हणालो, शेक्सपिअर हा डावा की उजवा हे सांगता येणे कठीण आहे, पण याचे उत्तर, ‘एस’ आणि ‘नो’ अशा दोन्ही पद्धतीने देता येईल. शेक्सपिअरची सर्व नाटके ही त्याच्या जगण्याचा एक भाग होती. शेक्सपिअरने एक साहित्यिक म्हणून त्याची निर्मिती केलेली नव्हती. तत्कालीन प्रचलित असलेली सर्वसामान्य इंग्रजी माणसाची भाषा (अँग्लो सॅक्शन) शेक्सपीअरने आपल्या नाटकात वापरली. तत्कालीन समाजाची करमणूक करणे हा एक प्रमुख उद्देश त्यांच्या लेखनाचा होता. नाटक करून चार पैसे मिळवणे यापलीकडे नाटकाचा त्याने गांभीर्याने विचार केला नव्हता/नसावा. शेक्सपिअरच्या काही समीक्षकांनी म्हणून शेक्सपिअरला ‘तमासगीर’ (हसवून लोकांची करमणूक करणारा) असे म्हटले आहे. हे सर्व करत असताना तो मानवी जीवनावर भाष्य करत गेला, माणसाच्या जगण्याचा खोलवर अर्थ त्याला सापडत गेला आणि ते त्याला सहज जमत गेले. त्यांची नाट्यअभिव्यक्ती ही सामान्य लोकांची असल्यामुळे ती लोकांनी उचलून धरली. संशय, महत्त्वाकांक्षा, हिंसा, बदला, मृत्यू, असूया, विश्वास/अविश्वास, प्रेम, मानसिक ताणतणाव (मनाची द्विधा अवस्था), बौद्धिक आणि निखळ करमणूक अशा अनेक सार्वत्रिक विषयांवर त्यांनी लिहिले. शेक्सपिअरचा कालखंड हा राजकीयदृष्ट्या कमी कलहाचा होता. त्यामुळे कुणाच्या बाजूने, हा प्रश्न त्याच्या नाटकांमध्ये कधी उपस्थित झाला नाही. सरंजामदारी/राजेशाही ही शेक्सपिअरच्या कालखंडातील राजकीय चौकट असल्याने शेक्सपिअरने राजेरजवाडे/राजपुत्र यांना खूष करण्यासाठीही नाटके लिहिली आहेत. त्याबद्दल त्याला पैसे मिळाले आहेत. म्हणून, शेक्सपिअरच्या अभिव्यक्तीला डावी अभिव्यक्ती म्हणता येईल? तेव्हा शोषितांच्या बाजूने वगैरे अशा काही चळवळीदेखील उपस्थित नव्हत्या. तरीदेखील ‘ऑथेल्लो’ आणि ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकांतून शेक्सपिअर यांनी वंशवादाचा प्रश्न हाताळला आहे.

ऑथेल्लो हा मुरु कृष्णवर्णीय आहे आणि त्याने डेस्डिमोना या श्वेतवर्णीय स्त्रीrrशी विवाह केला आहे. पण इथे वंशवाद हा विषय केंद्रस्थानी नाही. ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकामध्ये मात्र, शॉयलॉक हा एक ज्यू व्यापारी आहे. या नाटकातील न्यायालयीन प्रसंग हा एक फार गाजलेला प्रसंग आहे. झालेल्या कराराप्रमाणे अ‍ॅन्टेनिओचे हृदयाजवळचे एक पाऊंड मांस शॉयलॉकला कापून घ्यायचे आहे. म्हणजे जवळपास हा अ‍ॅन्टेनिओचा मृत्यूच आहे. इथे शॉयलॉकला

एक खलनायक म्हणून सादर केले आहे. शॉयलॉक हा ज्यू आहे हे इथे सतत लक्षात ठेवायला लागते. अर्थात, ही न्यायालयीन लढाई शॉयलॉक हरतो. न्यायालय त्याला सांगते की, ठीक आहे, तू अ‍ॅन्टेनिओचे एक पाऊंड मांस अवश्य काढून घे, पण हे करताना रक्ताचा एक थेंबही सांडता कामा नये. कारण तशा प्रकारचा उल्लेख करारात नाही. शॉयलॉकची सर्व संपत्ती काढून घेतली जाते. तो जवळपास भिकारीच बनतो. त्यांने ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश करावा, म्हणजे त्याला अभय मिळेल, हा सल्ला म्हणजे शॉयलॉकचे हे सक्तीचे धर्मांतरच म्हणावे लागेल. हा विषय निश्चितच राजकीय आहे. वंशवादाच्या राजकारणावर आणि धर्मांतरावर या प्रसंगातून काही महत्त्वाचे भाष्य शेक्सपिअर यांनी केले आहे. इथे शॉयलॉकच्या

अभिव्यक्तीला संपूर्णत: दडपण्यात आले आहे.

कवितेला आणि साहित्याला हद्दपार करण्याचा इतिहास अगदी प्लेटोच्या काळापासून आहे; तो काही आज नव्याने सुरू झालेला नाही. प्लेटोला अपेक्षित असलेली नीतिमत्ता कविता आणि साहित्यामध्ये अनुपस्थित आहे असा त्यांचा आरोप होता. तो किती निराधार होता हे त्याचे शिष्योत्तम, अ‍ॅरिस्टॉटल यांनीच नंतर सांगितले.

१९६४ साली जोसेफ ब्रॉडस्की या तेवीस वर्षांच्या तरुणावर रशियामध्ये सोव्हिएत युनियनच्या राज्यात लेनिनगार्ड या ठिकाणी न्यायालयीन खटला चालवण्यात आला. ब्रॉडस्की

या तरुणाचा गुन्हा काय होता? तर तो कुठल्याही प्रकारचे श्रम न करता काम न करता स्वत:साठी आणि स्वत:च्या कुटुंबासाठी कुठल्याही प्रकारची मिळकत न मिळवता तो कविता लिहिणे, साहित्य लिहिणे हा उद्योग करत होता. तत्कालीन रशियाच्या कायद्याप्रमाणे हा गुन्हा होता. अशा व्यक्तीची साहित्यिक निर्मिती हा एक सामाजिक निरुद्योग आहे आणि दुस्रया लोकांच्या श्रमावर होणारा नको तो हा भार आहे. साम्यवादी देशात अभिव्यक्ती किंवा स्वातंत्र्याचा अर्थ हा अशा पद्धतीने सामाजिक श्रमाशी जोडला जातो. व्यक्तीला काय वाटते? यापेक्षा समाजाची गरज काय आहे, असा एक मूलभूत प्रश्न या समाजरचनेत आपणाला दिसतो. म्हणून व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न या समाजरचनेत निकालात काढण्यात आला आहे. इथे व्यक्तीच्या अभिव्यक्तीला फारसे अस्तित्व नसते. प्राचीन ग्रीक समाजात नीतिमत्तेच्या संदर्भात उपस्थित केलेला प्लेटोचा प्रश्न हा सामाजिक आणि नैतिक तर होताच शिवाय तो विशेषत: कवीच्या संदर्भातला प्रश्न होता आणि कवी आणि कविता समाजाचे काही भले करू शकत नाही म्हणून त्यांना कुठलेही स्थान दिले जाऊ नये असा त्याचा आग्रह होता. अर्थात सोव्हिएत रशिया आणि प्लेटो यांचे परिप्रेक्ष्य हे वेगवेगळे आहेत.

फॅसिस्ट राज्यांमध्ये साहित्याचे काय स्थान असू शकते, असा एक प्रश्न नेहमी विचारला जातो; त्याची चर्चा केली जाते. अशा राज्य व्यवस्थेमध्ये साधारणपणे व्यक्तीच्या किंवा अनेक सामाजिक संस्थांच्या अभिव्यक्तीवर अनेक प्रकारची दडपणे आणली जातात. काय बोलायचे? यापेक्षा काय बोलायचे नाही? हे ठासून सांगितले जाते. सतराव्या शतकात सुरुवातीच्या काही दशकांत इंग्लंडमध्ये प्युरिटन लोकांनी अशाच प्रकारची कृती केली होती. या काळात इंग्लंडमधील सर्व नाट्यगृहे बंद करण्यात आली होती. याच काळात शेक्सपिअरची नाटके बहरत होती. अर्थात फॅसिस्ट आणि प्युरिटन या दोन चौकटीमध्ये काही साम्य जरी असले तरी, यातील राजकीय फारकत मोठी आहे. पण दोन्हीही चौकटी व्यक्तीच्या अभिव्यक्तीला मान्यता देत नाहीत.

काही हुकूमशहा आणि फॅसिस्ट राज्यकर्ते समाजातील साहित्यावर बारीक नजर असते. कोण काय लिहीत आहे? याबद्दल त्यांना स्वारस्य असते. हे स्वारस्य अर्थातच निखळ साहित्यिक अजिबात नसते, हे सांगणे गरजेचे नाही. ऑगस्टो पिनशे (१९१५-२००६) यांचे एक उदाहरण या संदर्भात द्यायला हवे. पिनशे हा १९७३ ते १९८१ पर्यंत चिली देशाचा स्वयंघोषित मिलिटरी अधिकारी आणि हुकूमशहा होता. १९८१ नंतर चिलीचा तो रीतसर अध्यक्ष झाला. त्याच्या मृत्यूनंतर महत्त्वाची गोष्ट प्रकाशात आली आणि ती म्हणजे, त्याची स्वत:ची व्यक्तिगत लायब्ररी. लॅटिन अमेरिकेमधील ही सर्वात मोठी व्यक्तिगत लायब्ररी असावी. त्यांनी जेवढ्या लोकांना छळले होते त्यापेक्षा अधिक पुस्तके त्याच्या या ग्रंथालयात उपस्थित होती. हुकूमशही वृत्तीची माणसे जगामध्ये पुस्तकांबद्दल (समाजामध्ये व्यक्त होणार्‍या अभिव्यक्तीबद्दल) किती संवेदनशील असू शकतात? याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.

थोडक्यात, माणसाची/ व्यक्तीची/ समाजाची अभिव्यक्ती ही अशी अनेक घटकांनी व्यस्त आणि ग्रस्त असते.

The Poetrywala Foundation is envisaged as a discerning and hospitable space in both digital and real-world mode for practitioners and readers of poetry and translation from India.

Copyright @2023  All Right Reserved – Designed and Developed by VR Webtek Solutions

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept