Home दिवाळी 2021ओपिनियन सुप्रिया सुभाष आवारे

सुप्रिया सुभाष आवारे

साहित्य आणि समीक्षा यांचा अन्योन्य संबंध दृश्य करणे तसे फारसे अवघड नाही. साहित्य विश्‍वामध्ये जेवढे स्थान साहित्याला आहे तेवढेच स्थान समीक्षेलादेखील आहे. समीक्षा प्रांत हा परोपजीवी मानला जातो. काहीवेळा दुर्लक्षितही केला जातो. तरीही त्यांच्यातील परस्परसंबंध नाकारण्याजोगा नाही हे मान्यच करावे लागते. समीक्षा नसती तर? अशी केवळ कल्पना केली तरी यामागची कारणं लक्षात येतात. समीक्षा साहित्याचे आकलन व निर्णयन सुलभ होण्यासाठी निर्माण झाली. समीक्षा ही साहित्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि साहित्यनिर्मिती प्रेरणा ती उल्लंघून मुक्त संचार करू इच्छिते. दोहोंमधील ही रस्सीखेच आस्वादक बनते तेव्हा दोघीही आपापलं स्वतंत्र स्थानच नोंदवत असतात. समीक्षा आस्वादक बनली की ती एखाद्या साहित्यकृतीहून उणी असत नाही, हे अनेक ज्येष्ठ समीक्षकांच्या समीक्षाग्रंथांच्या उदारणातून स्पष्ट होते. साहित्य आणि समीक्षा यांच्यातील परस्परसंबंध गहिरा आहे. अभिव्यक्तीच्या अवकाशात मुक्तपणे व्यक्त होणा‍ऱ्या साहित्याचे आकलन करून घेऊन काळ व समाज यांच्या कलाचे आकलन करून घेणे समीक्षेने साध्य होते. कारण साहित्यामधून काळ, समाज, मनुष्य अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या पातळ्यांवरून अनेक पद्धतीने व्यक्त होत असतो, हे कंगोरे समीक्षेशिवाय कसे समजून घेणार? आणि ते समजून न घेता साहित्य आणि साहित्य बाह्य परंतु साहित्याशी निगडित अनेक गोष्टींच्या परस्परसंबंधाची दिशा, प्रेरणा व परिणाम कशा समजून घेता येणार?

आज साहित्य आणि समीक्षा यामध्ये अनेक प्रवाह निर्माण झालेले दिसतात. जीवन व्यवहार व समाज व्यवहार यांना फुटलेल्या अनेक धुमर्‍यांचाच तो परिणाम नव्हे का? ग्रामीण, दलित, शहरी, महानगरीय, आधुनिकतावादी, अस्तित्ववादी, मार्क्सवादी, स्त्रीवादी, आदिबंधात्मक, रूपबंधात्मक हेच ते प्रवाह नव्हेत का? या प्रवाहांनी केवळ साहित्य प्रांतालाच विस्तृत करण्याचे काम केले नाही तर त्या त्या प्रवाहातील समाजाला मनुष्याला ओळख देण्याचे काम केले. काळसापेक्ष गरजेतून निर्माण झालेले हे प्रवाह आहेत हेदेखील इथे विसरता येणार नाही. साहित्य निर्माण झालं तरी समीक्षेने साहित्य प्रांताला अनेक नव्या संज्ञा, संकल्पना देऊन समृद्ध केले आहे. साहित्यनिर्मितीला दिशा दिली तर साहित्याच्या आकलनाला धारदार बनविले. साहित्यविषयक बौद्धिक खलाला उत्तेजन दिले. आजचा काळ सांस्कृतिक सपाटीकरणाचा काळ आहे असे ब‍ऱ्याचदा म्हटले जाते. या सांस्कृतिक सपाटीकरणात अडकलेले, भरडलेले अनेक समाज एकाच पृष्ठतलावरून व्यक्त होतील असे म्हणता येईल का? साहित्य्निर्मितीच्या प्रेरणा आणि गरजा या समाज, मनुष्य व कालसापेक्ष राहिल्या आहेत. तेव्हा आज काळ एकाच सपाट पृष्ठतलावर सपाटपणे अवगुंठित होतो आहे असे खरंच म्हणता येईल का? आजच्या काळापुढे अनेक आव्हाने असताना असे म्हणणे योग्य आहे का? काळ बदलला की साहित्याची दिशा आणि स्वरूप बदलत असते. या बदलाचे अर्थनिर्णयन समीक्षाच करत असते. आज स्त्रीवादाची भूमिका व स्वरूप बदलले आहे. स्त्रीवादी साहित्याच्या समीक्षेनेच तिच्याकडूनच्या आजच्या मागण्या व अपेक्षा जाणून घेता येणार आहेत. आज चूल, मूल, नवरा, शय्या, कुटुंब हे सर्व विषय विविध पद्धतीने स्त्रीवादाने हाताळून झाले आहेत. यापुढे जाऊन अनेक प्रश्‍न आहेत. आज स्त्रीविषयक साहित्याने काय ऐरणीवर आणले पाहिजे? हे लक्षात घेऊन सकस साहित्यनिर्मिती व्हावयास तिच्या समीक्षेचीच आवश्यकता आहे. गाव शहरात आणि शहर गावात घुसल्याने धेडगुजरेपणाचं स्वरूप पूर्णांशानं व्यक्त होणं गरजेचं आहे. त्याचे अनेक वंâगोरे व्यक्त होणं बाकी आहे. वास्तवात दृश्य एक आणि साहित्यात व्यक्त होतं ते वेगळंच या विरोधाभासातून साहित्यनिर्मितीला वाचवायला हवे. उत्तर आधुनिकता साहित्यामध्ये अनेकांगांनी व्यक्त होते आहे. यंत्राचं दुसरं नाव म्हणजे माणूस हे अधिक तीव्रपणे आधुनिक आणि उत्तर आधुनिक साहित्यातून व्यक्त होते. त्यातील शब्द, संज्ञा इतकंच वेगळेपण नाही तर कॉस्मोपोलिटिन सिटीतील माणसाची दु:खं व मानसिकता काय असते, हे त्यातून व्यक्त होते. ते समजून घेण्यासाठीच केवळ उत्तर आधुनिक समीक्षेची गरज नाही तर गावात शहर कितीही आलं तरी काही दु:ख ‘जावे त्यांच्या वंशा’ अशीच असतात. हे वेगळेपण लक्षात घेतल्याशिवाय एकमेकांना दोष देणं किंवा उणं अथवा मोठं समजणं टाळता येणार नाही. विशिष्ट भूमिका आणि तत्त्वं घेऊनच अशाप्रकारचे अर्थनिर्णयन करणे शक्य असते. जे केवळ समीक्षा पद्धतींनीच शक्य आहे. ज्यातून शहरी आणि ग्रामीण यांच्या संज्ञा पुन्हा तपासून पाहणे शक्य होईल. समीक्षा ही लेखकालादेखील आपल्या भूमिका समजून घेण्यासाठी व स्वत:च्या लेखन प्रवासातील बदल लक्षात घेण्यासाठी साह्यभूत ठरत असते. काळानुसार साहित्य प्रांतामध्ये अनेक बदल होत आहेत. साहित्यनिर्मिती ग्राहकवेंâद्री होते आहे. त्यासाठी नव्या तंत्रांचा आधार घेतला जातो आहे. डिजिटल पुस्तकनिर्मिती होते आहे. तरीही यास पसंती दाखवणारा वर्ग मर्यादित आहे. साहित्य म्हणजे काही केवळ ललित साहित्य नव्हे. त्यामुळे साहित्य आणि समीक्षा यांच्यावर त्याचा परिणाम होण्याची गरज नाही. उलट एक वर्ग जपताना दुसरा ग्राहक वर्ग वाचनापासून तुटू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. आणि या काळापुढे सर्वात मोठे आव्हान आहे ते समाजमाध्यमांच्या रेट्यातून येणा‍ऱ्या लेखन नामक गोष्टींपासून साहित्याची गुणवत्ता टिकवून ठेवणे. त्यासाठी समीक्षक व समीक्षेची गरज आहे. समाजमाध्यमांमुळे प्रत्येकालाच आपण लेखक व समीक्षक झाल्याचा आभास होतो आहे. अशा काळात साहित्यनिर्मितीने अधिक सावध असणे गरजेचे आहे. अशा अनेक बदलांना कवेत पकडणारे साहित्य निर्माण होते आहे का? याचा शोध घेऊन मार्गदर्शन होणं ही गरज आहे. साहित्य व समीक्षेच्या वर्गीकरणाइतकाच त्यांचा दर्जा सुधारणे आज गरजेचे आहे. पक्षपाती, एकांगी व संकुचित बनलेल्या समीक्षेची सोडवणूक करून दोहोंनी आपल्या भूमिका तपासून घ्यायला हव्या. साहित्यनिर्मितीतील एकसुरीपणा टाळून आशयाभिव्यक्तीमध्ये खोली यावयास हवी. नव्याने येऊ घातलेली तंत्र ही साहित्य प्रांताचा एक केवळ एक भाग आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

भ्रमणध्वनी- ८९७५८६८०७९

E-स्aग्त् घ्् – aa्ग्ंaह्प्ॅुस्aग्त्.म्दस्

The Poetrywala Foundation is envisaged as a discerning and hospitable space in both digital and real-world mode for practitioners and readers of poetry and translation from India.

Copyright @2023  All Right Reserved – Designed and Developed by VR Webtek Solutions

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept