अनिल साबळे
आपलंच लालभडक रक्त

पाखरं मारायची गलोल विहिरीत फेकून

तो असाच शेळया चारत चारत

रानातच रमायला लागला

लिंबाबाभळीचं झाड दिसलं की,

त्याने पाळलेल्या बेरड बकऱ्या

त्याला घेरा घालायच्या

तो बकर्‍यांची भूक ओळखून

आपल्याच तोंडाच्या बोळक्यांत कुर्‍हाड धरून

डाहाळे तोडायला सरसर झाडांवर चढायचा

एक दिवस उंच वाढलेल्या लिंबावर

त्याने शीळ घातल्या घातल्या

त्याच्या काळया बेरड बकऱ्या लिंबाखाली गोळा झाल्या

कुर्‍हाडीच्या दोन-तीन घावांतच

लिंबाच्या डाहळ्यांची फांदी

गलोलीचा खडा लागलेल्या पाखरासारखी

मान मोडून खाली पडायची

डाहाळ्यांच्या फांदीला बेरड बकऱ्या बिलगल्या तेव्हा

त्याला ऐकू येऊ लागली,

निमोण माथ्याला सुरू झालेल्या

बैलगाडीच्या शर्यंतीची आरोळी

धुरळा उधळत बैलगाडी धावू लागल्यावर

घोड्यांच्या पाठीवर वेताच्या काठ्या आणि

गो-ह्याच्या मांडीत टोकदार आऱ्या

कचाकच घुसत राहायच्या

मुलं घरात खाऊ मागायला लागली की,

तो विहिरी फोडायला निघून जायचा

विहिरी फोडायला जाता जाता त्याने पाहिले,

पोतंभरून शेंगदाणे खाणारे शर्यंतीचे गो-हे

आणि टिपाडभरून दूध पिणारे तांबडेपांढरे घोडे

पहिल्यावर छातीत आरी गुसल्यासारखं

त्याच्या दोन्ही डोळ्यांतून रडूच फुटलं

हातात आरसा धरल्यावर आपला चेहरा दिसावा

अशी होती त्याच्या हातातली चमचमती लख्ख कुर्‍हाड

जी कालच ढीगभर कोळसे देऊन

त्याने शेवटून आणली होती

लिंबाची फांदी तुटून त्याच्या पायावर आलेली कुर्‍हाड

बकऱ्याचं मुडकं छाटल्यासारखीच त्याचा

अंगठा छाटून गेली

तेव्हा तो लहान मुलासारखा झाडाखाली रडत बसला नाही

अंगातला सदरा तुटलेल्या अंगठ्याला गुंडाळून

त्याने शोधूनच काढला

बकऱ्याच्या खुराखाली तुटलेला त्याचा अंगठा

तुटलेला अंगठा सदऱ्याला पुसून

तो दवाखान्यात आला तेव्हा

डॉक्टर त्याला म्हणाले, ‘जे तोडून दिलंय

ते कुठंच जोडता नाही.

हवं तर तुझा पाय सडू नये म्हणून

मी रोज मलमपट्टी करत जाईल’.

तो लंगडत घरी आला तेव्हा मावळतीचं आभाळ

तोफेच्या गोळ्यासारखं लालबुंद झालं होतं

पावसाचं गढूळ पाणी पिऊन

ओल्या मातीत खुरं घासणाऱ्या बेरड बकऱ्या

हिरव्यागार लिंबाकडं वर मान करत पुन्हा त्याला घेरू लागल्या

डाहाळा केलेल्या त्याच लिंबाखाली

तो लंगडत लंगडत आला तेव्हा

लालतांबडया डे-यांनी तो लिंब फुलून आला

लिंबाकडं पाहून त्याला वाटलं,

आपल्याच अंगठ्यातलं वाहतं रक्त ह्या लिंबाच्या

सालीतून थेट लिंबाच्या मुळात झिरपलं आहे

आणि आपलंच लालभडक रक्त

लिंबाच्या पानापानातून फुलून आलं आहे 

एक ढगाळ दिवस

रंगीत चिंधीनं काडक्यांची मोळी बांधलेला माणूस

डोक्यात पांढरी टोपी घालून मोरीच्या भिंतीवर केव्हापासून बसून आहे

त्या माणसाची नजर घाटात तुर्रे आलेल्या सागावर खिळली आहे

दूर साचलेली पाण्याची थारोळी मला पत्र्यांच्या घरासारखीच दिसू लागलीय

हा माझ्याभोवती पसरलेला हिरवागार डोंगर

कुणीतरी चूड लावून पेटवून दिला होता

एक ओली पायवाट धरून मी गवताळ डोंगरावर आलोय

गळ्याला गळफास घेतल्यासारखा टॉवेल बांधून

एक गुराखी हातात भरीव वेताची काठी धरून उभा आहे

गवताळ टेकडीवर उभा असलेला हा हिरवा निवडुंग

आपल्या आतल्या हाडा हाडात

ओल्या बाळंतणीसाठी पांढऱ्या चिकाचं दूध साठवून बसलाय

आणि ही डोंगराच्या मधोमध असलेली खोल अंधारी गडद

ज्यात गाळात माखलेलं रानडुक्करं लोळत असतंय

आणि तो ओहळांच्या माथ्यावर उभा असलेला कातळकडा

आग्यामोहोळांच्या पोळ्यांनी लालभडक दिसायचा

आता तो कातळकडा शेवाळानं हिरवागार झालाय

ती भिजलेली नागमोडी डांबरी सडक

कौलारू घरांना विळखा घालून डोंगराआड गेलीय

लालभडक गढूळ पाण्याच्या डबक्याजवळ बगळे उतरले तेव्हा

फळताळ्या पायाचे पिवळे बेडूक तळाच्या मातीत जाऊन घुसलेय

हिरव्या कुरणातून सरळ आडव्या गेलेल्या पायवाटा

कुठे जात असतील

काळ्या पाठीची ही गाय

आपला पांढरा माथा घेऊन कुठे निघालीय

तो तांबडा मोकाट घोडा

ओलं गवत पायाखाली तुडवत दौडत दूर चाललाय

ती कुरणात तोंड खूपसून चरणारी वाकड्या शिंगाची म्हैस

पाठीवर बसलेल्या पाखराकडे पाहतसुद्धा नाहीये

पहाडावरून ढासळून पडलेल्या दगडावर

काळं कांबळं टाकून बसलेला गुराख्यांची लांब काठी

खडकावर झोपलेला तांबडा कुत्रा मध्येच डोळे उघडून पाहतोय

ही ढगावर पसरलेली भुतासारखी आकृती

हळूहळू आमच्या जवळ येतेय

पांढऱ्या माथ्याचं तांबडं वासरू

रामफळीच्या झाडांखाली ओलं गवत तुडवत उभं आहे 

मोरपिसं गळणाऱ्या ह्या सळसळत्या झाडावरून

म्हशीच्या पाठीवर बसलेल्या मोरांची पांढरी शीट

म्हशीच्या पोटावर ओघळत आलीये

आणि त्या लांडोरीने पाचोळ्यात घातलेली अंडी

म्हशीचा पाय पडण्याआधीच त्या मुलीने

अलगद उचलून घेतलीये

हे भरलेल्या आभाळाचे दिवस

पाखरांच्या घरटं बांधणीसाठीच होते रे

ती चोचीत गवताचं लांब हिरवं पातं घेऊन उडणारी मुनिया

काटेरी बाभळीत गोल गोल घरटं विणत बसायची

आणि ती माथ्यावर हळद ठेवलेली सुगरण

दिवसभर बाभळीच्या फांदीला उलटं लोंबायची

रानावनात घराअंगणात असलं तरी

घुंगरं बांधलेल्या एका मोराचे पाय

त्या मुलीच्या आसपासच नाचत असायचे

गोठा बांधायचं ठरल्यावर

झाडांच्या पोटावर कोयता मारून मारून

अनेक झाडानां ठारच करावं लागलं त्या मुलीला

आणि झाडाची सोलून काढलेली खोडं

म्हशीच्या गळ्यात लोढणं म्हणून

घरापर्यंत बांधून आणावीच लागली त्या मुलीला

दुभत्या म्हशीचं दूध अचानक उडायला लागलं तेव्हा

नाइलाजानं शिकार केलेल्या रानडुकराची पांढरी कवटी

जादुटोणा करून गोठ्यात बांधूनच टाकली लागली त्या मुलीला

कोंबडीच्या पंखाखालून उबलेले ते मोर

ऊन पाठीवर घेत बसलेल्या सापसुरळ्या आणि

वळवळत्या सापांची पिल्लं खाऊन टाकायची

कुणीही हात लावला तरी डोळे फोडणारे ते मोर

वाघाला लांब पाहिलं तरी मुके होऊन बसायचे

आभाळ भरून आल्या आल्या तेच मोर

निळा निळा पिसोरा फुलवून

लांडोरीच्या समोर रिंगण धरुन बेफाम नाचायचे

मेंहदी काढत असलेल्या ओल्या हातावरच

पायात घुंगरं बांधलेला एक मोर

निळ्या वंâठाची चोच मारायचा तेव्हा

मेहंदीचा ओला हात ती मुलगी

अंगणातल्या सळसळत्या झाडाला पुसून टाकायची

तेव्हा सळसळत्या झाडाचं हात पुसलेलं ते खोड

छातीवर बंदुकीचा बार टाकलेल्या मोरासारखंच दिसायचं

त्या मुलीच्या अंगणातलं ते सळसळतं झाड

मोर चढून बसल्यावर

पानगळीत सुद्धा निळं निळं दिसायचं

पाचोळा पडावा तशी मोरपिसं त्या मुलीच्या अंगणात पडायची

तरीही त्या मुलीला माहीतच नव्हतं

मोरपिसं गळणाऱ्या ह्या सळसळत्या झाडावरून

जीव गेलेल्या मोराचं एक दिवस रक्त टपटपणार आहे

पायात घुंगरं बांधलेल्या मोराचे पाय

आपल्याला झऱ्याच्या काठावर सापडणार आहे

आणि आपण दाणे भरवतोय त्या मोरांना

आपल्याच मातीआड करून टाकावं लागणार आहे

कधी कधी भरदुपारीच

आग्याकड्यांची मोहोळं काढायला माणसं यायची

आग्याकड्याला दहीभाताचा निवद ठेवून

ती माणसं काड्यासाबरीच्या धुरात

मधाच्या पोळ्या घोंगडीत कापून न्यायची

बेघर माश्यांची गुणगुण

घनदाट जंगलाला हादरून टाकायची

दिवस मावळून गेला तरी मोहोळांच्या माशा

आग्याकड्याखाली खात बसलेले मोर

त्या मुलीला घरी हाकत आणावे लागायचे

लालपिवळ्या भेंडीच्या सावलीत बसलेला म्हातारा

वाघाने मारून टाकलेल्या म्हातारीची आठवण

त्या मुलीला येता जाता सांगत असायचा

धडापासून तुटून पडलेला म्हातारीचा हात

झऱ्याच्या काठावर त्या मुलीलाच सापडला होता

म्हातारीच्या हातावर बांबूच्या बेटासारखं हिरवंगार

म्हाताऱ्याचं नाव गोंदलेलं होतं

जे वाघालासुद्धा खाऊन टाकता आलं नव्हतं

अंगणातल्या सळसळत्या झाडावर डोळे मिटून बसलेले मोर

वाघाने मारून टाकले तो दिवस

त्या मुलीच्या आठवणीतून पुसलाच जात नाहीये

ढगातल्या वाहत्या चंद्राला माथ्यावर धरून

ते झाड आपल्याच पानाच्या अंधारात उभं

बेसावध उभं होतं तेव्हाच झाडांच्या सालीत नखं रुतवत

एका वाघाचं धूड मोर बसलेल्या फांदीवर आलं होतं

झोपेत असलेल्या मोरांचे निळे निळे कंठ

वाघाच्या जबड्यात अडकले होते तेव्हा

आसवं गाळत गाळत तो चंद्र

काळ्या ढगात मावळून गेला होता

आणि गच्च काळोखात घुंगरं बांधलेल्या मोरालाच

तो वाघ ओढत ओढत झऱ्याकाठी घेऊन गेला होता

कंठ जबड्यात अडकलेल्या मोरानं

त्या मुलीला शेवटची हाक मारून पाहिली होती

जी काळोखातच विरून गेली होती. 

ओले काजवे उजेड घेऊन

पाऊस उघडला आणि एक निळा ढग

त्या मुलीच्या गावावर पाखरासारखा उतरला

हातातला आरसा पुसता पुसता

ती मुलगी हिरव्या झाडीत ढग

बुडल्यासारखी एकजागीच उभी राहिली

निळा ढग उतरलेलं आपलं गाव

पाहता पाहता त्या मुलीच्या हातून

निसटून पडला हातातला ओला आरसा

फुटलेल्या आरशाच्या काचा वेचताना

त्या मुलीला एकदम आठवलं

डोक्यावर ईरलं पांघरुण आपलं अंगणातलं गारा वेचणं

मध विचारत मी त्या मुलीचं घर गाठलं तेव्हा

त्या मुलीच्या काळोख्या अंधाऱ्या घरात

बकरीची कोवळी पिल्लं मे मे करत होती

जाळ पेटलेल्या चुलीच्या उजेडात

ती मुलगी माझ्यासाठी भरू लागलीय

जाडसर पिवळ्या मधाची बाटली

अंधाऱ्या घरात पाय आखडलेली

त्या मुलीची म्हैस मोठमोठी खुरं टाकत

घराबाहेर आपली मान हालवत आली

तळ्यातलं एक हिरवंगार बेट

त्या म्हशीनं गोल डोळे गरगर फिरवत पाहून घेतलं

आणि त्या मुलीची म्हैस

अवजड शिंगाचं डोकं वर काढून

गळ्यातलं लोढणं ओढत ओढत

गच्चं भरलेल्या तळ्यातून हिरव्यागार बेटापर्यंत

आपले काळे पाय हालवत हालवत

एका दमातच पोहून आली

अचानक फुटलेला पाऊस

दिवस अंधारून येईपर्यंत कोसळत राहिला

तेव्हा मी भिजलेल्या शेळ्याच्या कळपाजवळ

बकरासारखा बसून राहिलो होतो

बेटावरचं गवत खाऊन जागलेल्या म्हशी

अंधार पाठीवर घेत पोहत निघाल्या

म्हशीच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज

त्या मुलीच्या अंगणाकडे येऊ लागला तेव्हा

बाहेरच्या गच्च काळोखात

फुटलेल्या आरशाच्या काचेसारखे

ओले काजवे उजेड घेऊन

गडद काळोखात उडू लागले. 

एकमेकांच्या हिरव्यागार कानात

झाडावरची लालसर उंबरं खाता खाता

तो मुलगा पाहतच राहायचा

एका एका वेड्या राघूचं

अंगणातून दूर गेलेल्या तारेवर किलकिलत बसणं

त्या मुलाला वाटायचं,

ही घराघरात उजेड पडणारी विजेची तार

पाखरं बसायलाच बांधलेली आहे

चोचीत धरलेली मधमाशी

तारेवर आपटून खाता खाता

राघूच्या पंखातून उडालेलं निळं पीस

त्या मुलांच्या हातीदेखील लागत नव्हतं

ते वेडे राघू अंधारात मिसळायला लागले की

त्या मुलांच्या अंगाला थंडी वाजू लागायची

पाखरासारखं पंखात चोच खुपसून

त्या मुलाला कुठं बसता येत होतं

एकमेकांच्या हिरव्यागार कानात

रानात मधमाशा मारून खाल्ल्याच्या गोष्टी सांगता सांगता

ते राघू तारेवर थव्याथव्याने गर्दी करायचे

हे वेडे राघू भाजून खाताना

तळहातावर तेल तेलच ओघळत राहते

ही गोष्ट त्या मुलाला

मांडीवर निखारा ठेवल्यासारखीच वाटायची

एकमेकांला घट्ट बिलगून झोपी गेलेला

वेड्या राघूचा हिरवागार थवा

त्या मुलाला झेलूनच घ्यावा वाटायचा

डोंगरातून विळ्याने कापून आणलेल्या

ओल्या गवताच्या ओझ्यासारखा

ऊन पाठीवर सांडू लागलं म्हणजे

काटेसावरीच्या कापसासारखा

एक एक हिरवा राघू

मधमाशा मारायला दूर उडून जायचा

तेव्हा वाऱ्यावर हेलकावे खात मोकळी पडून असायची

घराघरात उजेड पडणारी ती विजेची तार.

aहग्त््ेaंत८०ॅुस्aग्त्.म्दस् 

The Poetrywala Foundation is envisaged as a discerning and hospitable space in both digital and real-world mode for practitioners and readers of poetry and translation from India.

Copyright @2023  All Right Reserved – Designed and Developed by VR Webtek Solutions

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept