चाहूल
तो बोलत होता तेव्हा
मी पाहत होतो खिडकीतून
झाडाच्या विरळ डहाळीला
एक फळ लोंबत होतं, वाळूनकोळ
तरी पक्षी चोचत होता
त्या काळ्याठिक्कर पाषाणातून
अर्थप्रवाही दर्शन
– आणि मी पक्ष्याला बघण्यातून
मला कोणी असेलच बघत
शासनाशिवाय सुद्धा
एखादी कविता व्हावी
असं काकुळतीनं वाटलं
तेव्हा तो पक्षी उडाला
बुबुळात ऊन उतरलं
खिडकीच्या जाळीवर
गडद सावल्या व्यक्त
खोलीतून मनात अंधार व्यस्त
तरीही तो बोलतच होता
धीरगंभीर हळूहळू
कोणालाच ऐकू जाऊ नये असं
स्वत:शीच
जन्म
भिंत एकच आहे. खिडकी असावी म्हणून भिंतीला वाकडं-तिकडं दुमडलं
खरंतर या सगळ्या खोल्या एकाच खोलीत आहेत, माझ्या आठवणीत- काहीच वेगळं
नाही
आठवण
ही भिंत पूर्वी अशी नव्हती
तिच्यावर एक युद्ध सुरू होतं. सगळं सैन्य. वाऱ्यावर हेलकावत. मी पाहत राहायचो,
चेहरे. एक मुसमुसत जाणारी रेल्वे
भिंतीवर पाण्याचे थेंब टिचवायचो. त्यांच्यात स्पर्धा असायची कोण आधी पोहोचेल.
कधीकधी ते एकमेकांत मिसळायचे
खालच्या भिंतीवर मात्र अश्रूच अश्रू
मग भिंतीला रंग दिला, खिडकी बंद झाली
अन् माझं घर माझं नव्हतं
पुनर्बांधणी
आता हळूहळू हळूहळू रंग पडतोय गळतोय सडतोय लोंबतोय विझतोय
माझी भिंत नाकारतेय या रंगाला
आणि त्यातून मला आता आता दिसत आहेत अस्पष्ट, मी बांधलेल्या मिथकांचे
रचनावशेष
बंड
या ओळी पुन्हा वाचल्या तर आता काहीच अर्थबोध होत नाही
शब्दाच्या शब्द अस्पष्ट झालेत त्यांच्यातले
सबंध अन् त्यांच्यातल्या जागा अवाजवी
भरून आल्या जवळ किंवा दूर
तरीही वाचून पाहिले मी पुन्हा एकदा
पुन्हापुन्हा एकदा
परत
सांगाडे
उभ्याआडव्या रेषांचे एकमेकांवर
र
च
ले
ले
सभ्यतेच्या घरांच्या उद््ध्वस्त अवशेषांत
निखळलेल्या सळ्यांसारखे
अन् एकट्याच उभ्या दारासारखा
पूर्ण विराम
वाचला मी खूप प्रयत्न करून
संदर्भांच्या मृगजळात
सवय झाली होती सगळं
छान छान सोवळ्यात पाहण्याची
तशी होत नाही उकल आता
या पूर्वीच्या साध्या सरळ शब्दांची
त्यामुळे मला बांधावी लागेल
एक सतत तुटत जाणारी रचना
तिचे शब्द जसे
इकडेतिकडे उजाड भटकणारे
कुत्रे
जे तमा नाही बाळगणार
सुसंस्कृतिकरणाच्या रस्त्यावर
मोजून मधात झोपायची निवांत
उठून निडर पावलांनी
मुतेल ते चाकावर
नेम धरून
अ ” ण्या ” अ स ”
” ” ” ” न ” ”
न ” ” ” अ ” ”
” ” ” चं न ” ”
न ” ” त ” ” ”
अ ” ” ” न ” ”
न ” ” ” अ ” ”
अ स ” ” ” ” णं
दिवास्वप्न
पातं यावं सरळ हाडावर
बोटं दुमडतील पायाआत जायला
मग विचारांची चिळकांडी फुटावी
उमलून येईल माझ्या
मेंदूत एक शिंपला
शिंपल्यातल्या समुद्रध्वनीने
खिडकीतून उमटणारा प्रकाश
मिटून घेईल स्वत:ला
तेव्हा तू भिंती सुट्या करशील
आणि खिडकीची जागा बदलत
गावोगावी हिंडून
जिथे तिथे अडकलेल्या चिमण्यांना
खिडकीतून मुक्त करशील
काही चिमण्या परत येतील
तेव्हा ही खिडकी
नेहमीच तुझ्याजवळ ठेव
कधी आपणही एकमेकांना
या खिडकीतूनच पाहू
एखाद्या चित्रासारखं वाटेल
तुलामाझं मलातुझं जग
मग मुक्त करू एकमेकांना
चित्राआत
बांध
तू तुझं हसणं दोरीवर लटकवून निघून गेलीस
तेव्हापासून वाट पाहिली मी
सुकत जाण्याची
तू दिलेल्या इराणी रंग
लेपलेल्या डबीत
जपून ठेवावं तुझं हसू
जेणे करून
आणि मधून मधून
डबी उघडून
सुगंध घ्यावा त्याचा
क्वचित नेसावं डोळ्यात
उगाच नाही धरून ठेवत ते
दोरीवरून टपटपणारं पाणी
तू गेलीस तेव्हापासून
ताम्रपट
मला एकाएकी असं वाटलं
ताम्रपट नावाची आपली कविता असावी / व्हावी
अजूनही डिप्रेशनचा वास तोंडात जाणवला की
धस्स होतं
खिडकीतून अंधुक खोलीत
तिरिपणाऱ्या उन्हासारखं
ते वाट बघत असत
छातीभर मावायला
तू दिलेल्या जागांवर
रात्री अपरात्री
फिरणारं मन
आता विव्हळत नाही
त्याच्या निमूट डोळ्यात
एक स्वप्न विझलं; तेव्हा
धुराचा
निमुळता
धागा
विरला
उन्हाच्या
पहिल्याच
तिरीपेत
चकाकून
काही निष्कर्ष । र्षष्वनी हिफा
खरंच आज कुणाचंही लक्ष जाईल
अशा ठिकाणी एक फूल उगवलं
अगदी खोटंखोटं वाटणारं त्यामुळे
कोणाला वाटलंच नाही
खुडावं
(इथून पुढे शब्दच्छल करण्याचा हेतू)
तर काही गोष्टी जपल्या जातात
त्या खोट्या वाटतात म्हणून
अन् खोट्याखोट्याची सवयच झालीये एव्हढी
की खरी पण अगदी खोटीखोटी वाटल्याशिवाय
खरीच नाही वाटत
किती सुरेख आहे आज, अगदी खोटाच वाटतो
जणू कोणीतरी चिकटवलाय
ती चंद्राकडे पाहत म्हणाली होती
– एकदम आठवलं
फार खरंखरं वाटलं तर खोटं असते
म्हणजे खोटं बोलायचं असेल तर फार खरं वाटेल
असं बोलू नये
किंवा बोलावं
हे सगळं नको
नकोसं झालय…
स्वत:त खरेपणा आणणं आणि
खरेपणा स्वत:त शोधणं
– कवितेत खरेपणा पेरणं
कवितेतला खरेपणा
नकोसा झालाय
हे सगळं नाही केलं तरी चालेल
किंवा अगदी असंच सरसकट करत राहावं
गरजेला बळी पडत
(इथे अजून काही ओळी हव्या होत्या
कविता लवकर,अर्धवट संपते असं वाटते
पण ओळी सुचत नाहीत
विचार करायला नकोसा होतो
पायाची अस्वस्थ बोटं त्रास्तात, मुंग्या येतात
कशाचीतरी खूप घाई होत आहे)
– खरंतर असं काही करूच नये
फार तर
अशी खोटीखोटी कविता वाटली की सरळ फाडून
टाकावी
शहराच्या तीन नोंदी
१.
कश्या बदलताहेत सावल्या
निरभ्र आकाशात
कॅथेड्रलच्या आवरणातून
गळून
जश्या अंधाऱ्या बाल्कनीतून
उडणारे पांढरे कबुतर
हरवते धुक्यात
२.
चिमणीतून येणारा धूर
करडा
रंगांच्या अंगणात चिमण्या
ग्लानीत चिवचिव करतात
पोटात
साचतो करडाचकरडा
३.
तिसरी नोंद हरवली
–अनिरुद्ध दिवाकर आचार्य
पिस्ते
टरफल काढणं
एक अनुभव असतो
दोन अंगठ्यांची नखं कपारीत
अन् आठ बोटं इवल्या पिस्त्यावर दाबून
ही प्रक्रिया होते
कपार नसतेच तेव्हा
दाताखाली कडकवून
कधी पिस्ता अर्धार्धा
एकेक खोबण वाटून घेते
नखं कुर्तडलेल्या बोटांना
दात उकरून देतात पिस्त्याला
या प्रक्रियेत आयुष्यात कष्ट करून खाल्याचं
मिळते समाधान
पिस्ता अश्रूसारखा खारटगोड. चाटून
टरफल लाळ सुरू करतं
बाबा टरफलं जपून ठेवतात
टरफलांचं काहीतरी करता येईल म्हणून
अर्थात आम्हाला त्यांचं
काही करताच नाही आलं कधी
घराची टरफलं पडली तेव्हा
आत एकही पिस्ता नव्हता
एका डबीत मात्र
बाबांची टरफलं भेटली