हरकाइट्स कॅनो
लगेच खाण्यासाठी जुने सार्डिन मासे

कवितांचे चांगले पुस्तक

सार्डिनच्या कॅनसारखे असावे

ताजे, पौष्टिक, ज्यातून मिळेल पोटॅशिअम आणि कॅल्शियम

किंवा असावे एका घाणेरड्या स्रावासारखे

ज्याच्या वासानेच आपण पळत सुटू, विरुद्ध दिशेला

आपल्याच भीतीच्या कैदेत,

कुजलेल्या सार्डिनचा कॅन, त्यात त्यांची

तीक्ष्ण दात आणि तीव्र डोळ्यांची

बेचिराख डोकी

हे किंवा ते

आणि असे,

चांगल्या कवितांच्या पुस्तकांसारखे

असावे तुमचे जीवन  

-मराठी अनुवाद मुस्तन्सीर दळवी

जर कधी मला हे घर, जे माझे नाही, विकावे लागले तर 

मी असं म्हणेन की

त्यात दहा चौरस मीटर खिडक्या आहेत

जिथे नजर टाकाल तिथे

दहा चौरस मीटर शुभ्र निळे आकाश दिसेल

कुणालाही मग खुमखुमी येईल की

एक स्क्रुड्रायवर घेऊन

काढाव्यात सर्व खिडक्या उपटून

आणि द्याव्यात जमिनीवर ठेवून

मग घ्यावी झेप

त्या दहा चौरस मीटर शुभ्र,

कधी न गंजणाऱ्या निळसर आकाशात.

पण कवीने फार पूर्वी सांगितल्याप्रमाणे

आकाश निळसर नाही, आकाश

हे आकाशच नाही.  

-मराठी अनुवाद मुस्तन्सीर दळवी

एक नवीन स्टेशन

त्यांनी एक नवीन स्टेशन बनवले

आपल्या तारुण्याच्या अवशेषांपासून.

येथे सर्व गाड्या भरून येतात, जळजळीत, किंचाळत.

रेल्वे ट्रॅकवरील दगड जणु मकबरे आहेत

आधी तिथे असलेल्या वेड्यांच्या इस्पितळाचे.

ह्या प्लॅटफॉर्म्सला विचित्र वास सुटलाय.

इथले ट्रॅक्स बनलेत अस्वस्थ माणसांच्या कवळ्यांपासून

वेडाच्या पार

जड गाड्या वगळता,

आपले आयुष्य हे प्रवासासारखे नव्हतेच.

पाण्यावर फुलताहेत बुडालेल्या सूटकेस.

मुद्दाम विसरलेल्या सूटकेस वगळता,

आपले मरण हे प्रवासासारखे नव्हतेच.

मी आणखी काही बोलू शकलो असतो, पण

प्रत्येक संध्याकाळी समुद्र आजारी दिसतो, आम्ल.   

-मराठी अनुवाद मुस्तन्सीर दळवी

चांगला लांडगा 

चांगला लांडगा एक असा लांडगा आहे

जो दुसऱ्या चांगल्या लांडग्याचा भक्षक नाही.

जो, सर्वप्रथम, ह्यातला फरक जाणू शकतो.

जो, अर्धपारदर्शक नजरेने, तुमच्याकडे टक लावून पाहतो,

आणि देतो ताकीद नजरेने, जेव्हा तुम्ही ओलांडता बर्फाने गोठलेला तलाव,

तुमच्या गळ्यात रुतवेल तो

त्याचे तीक्ष्ण सुळे, पण केवळ नाइलाज म्हणून;

आणि नंतर चावत सुटेल बर्फ,

अपराधाची कबुली म्हणून किंवा अपराधाची शिक्षा म्हणून.

तो तुमच्या डोळ्यांचा पिच्छा पुरवतो आणि जराही शंका आली तर

सरळ घेतो झेप, बाहेर नव्हे, तुमच्या डोळ्याच्या काळ्या बाहुलीमध्ये.

अनुवाद मुस्तन्सीर दळवी

लबाड लांडगा 

तो चांगला लांडगा आहे

जो आधीच चांगला होता, किंवा नंतर.

किंवा आक्रंदणाऱ्या वावटळीत

किंवा जेव्हा त्याचा पंजा सापळ्यात अडकला होता तेव्हा. नक्कीच.

त्याच्या छातीत एक चांदीची गोळी धडधडत होती तेव्हा.

तो बचावतो, आणि निघतो अपराध्याच्या शोधात,

जबड्याच्या प्रश्नासमोर विवेकाची माघार.

ह्या लबाड लांडग्याचं एक चांगलंय

तो स्वत:च्या पायांवर आणि सुळ्यांवर डोळे झाकून भरोसा करतो.

जेव्हा तो दुसऱ्याचे भय हुंगतो

तेव्हा तो त्यावरून हळूच पुढे सरकतो

जणू भय म्हणजे एक पादचारी पूल.

त्याला वाटतं की त्याची मोहकता त्याला वाचवेल,

मोहकता त्याला वाचवू शकणार नाही, पण तिच्यामुळे त्याला बळ येते.

-अनुवाद मुस्तन्सीर दळवी

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept