मीथक मांजर – १
१.
मांजर हरवली आहे.
मागील तीन दिवसांपासून मांजर हरवली आहे.
किंवा ती वर्षभरापासूनच कोणाला दिसलेली नाहीये
किंवा अनादी काळापासून कोणी पाहिलेलं नाहीये तिला.
मागील तीन दिवसांपासून
किंवा वर्षभरापासून किंवा अनादी काळापासून
माणूस तक्रार करतोय की मांजर हरवलीये
आणि आवंढा दाटून आलेलाय
तीन दिवसांपासून किंवा वर्षभरापासून किंवा अनादी काळापासून
माणसाच्या घशात मांजर हरवल्यामुळे
मांजरीला कोणी पाहिलं शेवटचं?
तर असंख्य हात उतावीळपणे वर येतात.
प्रत्येकानेच जणू काही कधी ना कधी पाहिलेलं आहे मांजरीला
कधी पाहिलं मांजरीला तुम्ही?
तर असंख्य आवाज खात्रीशीररीत्या ओरडतात
तीन दिवसांपूर्वी किंवा वर्षभरापूर्वी किंवा अनादी काळाच्याही पूर्वी
कशी होती तुम्ही पाहिलेली मांजर?
तर आता तुमच्या मेंदूत जी मांजर तुम्हाला दिसतेय
तसं तर कोणीच करत नाही तिचं वर्णन.
सर्वानुमते तिला जेव्हा शेवटचं पाहिलं
तेव्हा तिने आ वासलेला होता.
आणि ती तोंड बंद करू शकत नव्हती.
त्यानंतर तिला कोणीच पाहिलं नाही.
मांजर हरवली आहे.
तुम्ही तिला शेवटचं कधी पाहिलं?
मीथक मांजर – २
१.
मांजर सापडली आहे.
नुकताच ब्रेकिंग न्यूज आली आहे.
मांजर सापडली तेव्हा तिचं
हरवतानाचं आ वासलेलं तोंड आ वासलेलंच होतं.
प्रत्यक्षदर्शीने कथन केलं
शिवाय तिच्या मिशा हसत होत्या.
आणखी एका प्रत्यक्षदर्शीने कथन केलं
शिवाय तिच्या डोळ्यांतून करुणा सांडत होती.
आणखी आणखी एका प्रत्यक्षदर्शीने कथन केलं
शिवाय तिच्या गळ्यात कोणीतरी सत्य बांधलेलं दिसून आलं होतं.
अजून एक प्रत्यक्षदर्शी
तिच्या गळ्यातलं सत्य घंटेसारखं वाजल्यानंच तिचा शोध लागला
असं वृत्तनिवेदिका ओठांच्या चंबूतून सांगत होती.
जगातल्या सर्व टिव्यांवर आता एकच एक्स्äलूजीव ब्रेकिंग न्यूज होती.
मांजर सापडली आहे.
जगात सर्वांचेच डोळे टिव्यांवर आतुरतेने खिळले गेले होते.
हरवून पुन्हा सापडलेल्या आणि आ वासलेल्या
मांजरीच्या करूण डोळ्यांतून एक कटाक्ष सांडावा
आणि आपलं जीवन सार्थकी लागावं म्हणून प्रत्येक जण हपापलेला होता.
थोड्यााच वेळात
कॅमेरामन अमुकसोबत
वार्ताहर तमुक घटनास्थळी पोहचणार होते.
मीथक मांजर – ३
मांजर सापडण्याच्या आदल्या रात्री घडून आलेली एक अभूतपूर्व घटना
आकाश चांदण्यांनी चमचमत होतं.
संपूर्ण आकाशात एकमेव ढग तरंगत होता.
मी तो ढग पाहिला मात्र आणि
मांजरीची तीव्र उबळ माझ्या आत दाटून आली.
मेंदूत मांजर थयथय नाचू लागली.
आ वासलेला असल्याने ती मॅव करू शकत नव्हती
मी आकाशाकडे पाहिले
आ वासला
घशात मांजर दाटून आली
ढग मांजरीसारखा होता.
अगदी तीच तशीच मांजर
आ वासलेली आणि तोंड बंद न करू शकणारी
अगदी तशीच
गळ्यात सत्य बांधलेली
अगदी तशीच
सर्वांना हवीहवीशी
अगदी तशीच
जशी आता तुमच्या मेंदूत आहे.
मी मांजरीच्या आकाराच्या ढगाकडे
भक्तीभावाने बघितलं.
भक्तिभावाने बघता बरोबर
मांजरीच्या आकाराच्या ढगाच्या ढगाळ गळ्यातील
घंटेचा निनाद निनादला.
हाच तो आवाज.
हाच तो स्वर
हाच तो शब्द
हेच ते अस्तित्व
सत्य सापडलं.
नंतर काय झालं?
नंतर काय झालं मला काहीच आठवत नाही.
मी भानावर आलो तेव्हा
वार्यासारखी वायरल झालेली
बातमी माझ्या कानावर आली.
मांजर सापडली आहे.
आ वासलेली आणि तोंड बंद न करू शकणारी
आणि हरवलेली मांजर सापडली आहे.
तर हा होता मांजर सापडण्याच्या
आदल्या रात्री घडून आलेला अभूतपूर्व दृष्टांत.
मीथक मांजर – ४
मांजर हरवण्याआधी काहीच नव्हतं.
काहीच नव्हतं मधून मांजर निर्माण झाली.
मग मांजरीच्या जांभईतून हे विश्व
मग हे विश्व पसरू लागलं
पुढचं सगळं तुम्हाला माहिती आहे.
तुम्हाला जे माहिती नाही ते हे की
आपण सर्व मांजरीच्या जगड़्व्याळ
कंटाळ्याची लेकरे आहोत