पीयूष ठक्कर
अक्षर

मी तुम्हाला एक अक्षर देऊन जाईन

कदाचित तुम्हाला माहीतच नसलेल्या अशा भाषेतलं

असं होईल की तुम्ही त्या अक्षराला

कुठेतरी ठेवून विसरून गेलेला असाल

असं होईल की त्या अक्षराला

मंदिराच्या खोबणीत ठेवाल नि पुजाल पण खरे

असं होईल की तुम्ही बेचकीत दगड ठेवाल

तसे अक्षराला दूर आकाशात फेकाल

असं होईल की तुम्ही तो थुंकून काढाल

दातात कुसणारी कणी समजून

तुम्ही त्याचं जे कराल ते, तुम्हालाच ठाऊक

मी तर तुम्हाला एक अक्षर देऊन जाईन 

ते घर

त्या ठिकाणी

काहीएक नाही घडत

घर घराच्या ठिकाणी

सदाकाळ तसंच्या तसं

जसं आकाश यावं भरून

वय वाढेल

घरापासून वेस

वेशीपासून जाऊ दूर

सगळ्या अवयवांवर

उमटेल काळ

बदलेल

बदलतील

बदलत राहील सगळंच आपल्यात

आपल्याविषयी की त्याच्याविषयी

पण–

दूर तिकडे

घर घराच्या ठिकाणी सदोदित

जसंच्या तसं राहील की

जसं आकाश-खरोखर? 

 

आपला काळोख

१.

डोळ्यात डोळे खुपसून उभा राहिलो

माचिस घासली पण

ना त्याच्या डोळ्यात, की नंतर

डोळ्यात पडलेल्या माझ्या प्रतिबिंबात

कुठेच उजाडलं नाही

मी पाहिलं की

माझ्या भवताली जे गर्दी करून आहे

माझ्यात जे जळतंय पेटतंय-तो काळोख

नाही मला चैन देत

की कोणाला सांत्वन देणारी निद्रा

ज्याला ज्याला भेटलो

दगड दगड शोधून, स्फुल्लिंग करून

रात्र नि दिवस पेटवले

मी त्यांच्याजवळ पण गेलो

नाव देऊन बोलावलं

ओरडलो

पुन्हा माचीस घासली

मला समजलं की कदाचित

आम्हीच पेटवलेल्या दिवस नि रात्रीच्या ज्वाळेत

सगळेच पेटून गेलो होतो.

२.

आपण दिवा पेटवण्यासाठी झगडलो

अन् दिवा पेटला पण खरा

त्याच्या उजेडात जे काय दिसलं

ते न्याहाळण्यातच

आपण असे काय तल्लीन झालो की–

विसरलो

दिवा विझू शकतो

प्रकाश खूप काळ काही टिकणार नाही

दिवा ठेवलेला आहे त्या जागी

पोहोचण्याचा काहीएक मार्ग नाहीए

आणि हे पण विसरलो की

हा काळोख

काळ्याभोर सन्नाट्यात

पाहिजे तेंव्हा जोखू शकतो

घासू शकतो

आपण तर वेडे, मुग्ध, खी खी करून हासत

ओटपोट होताना

आपल्या डोळ्यावर

अन् उजेड करण्याच्या आपल्या करामतीवर

३.

मंद उजेडात बसलोय

उजेड

मध्यरात्रीचा आहे की पहाटेचा

की आहे कुठल्या हरवून पडलेल्या स्वप्नाचा

समजून येत नाहीए

मंद प्रकाशात

मंद मंद बसलेलो आहे

कदाचित नि जर

प्रकाश उगवेल-पसरेल

तर पसरून जाईन

नि जर तो मावळला

तर मीही

त्याच्यासोबत विलीन होईन, हे नक्की!

४.

माचीसच्या खोक्यासारख्या खोलीत बसलोय

माचीसच्या खोक्यासारख्या खोलीत बसलोय

पण आगकाड्यासारखं काहीच नाही

येथून तर

आग लागण्याची

भडका करण्याची

भडका होण्याची

कोणतीच शक्यता नाहीए

दाट काळोखाए

जळून गेलेल्या आगकाडीच्या टोकावर असतंय, तसंच

जर का आगकाडीच्या जळून गेलेल्या टोकाने

अक्षर लिहू शकतो

पण ह्या अंधाऱ्या काळ्या काजळीसारख्या काळात

स्वत:ची ओंजळ पण ओळखू नाही शकत

५.

माझ्या भाषेबाबत

स्वप्नात लिहितोय कविता

जी भाषेत लिहू नाही शकत

त्याच भाषेत लिहितोय अक्षर

वेगाने, एकाग्रतेने, संशयाने, की

अशी गवसलेली भाषापण फिरवेल तोंड, मुकी होईल

त्या आधीच

दोन एक गोष्टी नोंदवून घेऊ

माझ्या भाषेत पसरलेल्या धुराबाबत

कवितेतही खणकणाऱ्या चमकणाऱ्या मुखवट्याबाबत

आत्म्यात कोसळणाऱ्या उजाड त्याच्या प्रतिध्वनीबाबत

हळूहळू

जखमी डोळ्यांनी

लिहून घेऊ धुळीत

एक ही कविता

इकडे फिरून

वादळ धडकण्याआधी

कशाची बात करू

हिसकावून घेतलेल्या माझ्या जमिनीबाबत.

६.

कूस बदल

असा नि असा पडून राहिला तर

भाषेच्या पाठीवर वळ पडतील

जीव अवघडून जाईल

मग कवितेचे डोंगर कुठून बांधशील

तुझे सगळे मनसुबे उधळून देतील असं

मजबूत घेराव घालून बसलेले आहेत भाषेचे व्यापारी

तोडून भुकटी कर कोपऱ्यात पडलेली ही साहेबी,

माझ्या साहेब

वूâस बदल

नाहीतर

तुझ्या पाठीच्या कणासारखं

तुझ्या अंतरात्म्याला घात लागेल

डोळ्यावर झापडांचे थर चढतील

मग पक्षी तर काय

तुला तुझेही आवाज ऐवूâ येणार नाहीत

तूच तुझ्या एकमेकांत गुंतलेल्या पायवाटेत,

लोळण्याच्या स्वप्नात

काळवंडून जाशील.

घे! कित्येक वेगळ्या, भले नागाच्या वेटोळ्यात-पण कित्येक

वेगळी स्वप्ने पाहू शकू

७.

लेखनाविषयी-२

लिहीन का

एक कविता

वा तर नंतर कवितेसारखं काही

कधी लिहीन काय

जिला येणाऱ्या काळाचा अंदाज नाही

उलटलेला काळ जिला आठवत नाही

जिला काळाच्या अंतिमतेचं गणित समजलेलं नाहीए

उजेडात जो स्वत:च्या सावलीच्या आधारे चालतोय

काळोखात झोपेच्या तळाशी चाचपडतोय, कण्हतोय

पण रात्रीला ओळखू शकत नाहीए

जो ओंजळ पेटवू शकत नाहीए

शब्दांच्या उतरत्या नि चढत्या लयीत घुटमळत

छंद चुकून जाता नि पूर्णविराम येण्याआधी थकून जाता

पूर्वजांची उड्डयन व उत्खनन कुठून कळू येणार

जो शब्द उच्चारण्याआधीच धुळवडीत सापडताना

ह्या वेदनेचं नाव कसं पुन्हा लिहिणार?

क्षणाक्षणाला स्वत:च्या कथा ज्याला छळतात,

तो तुझ्या की तुमच्याबरोबर कुठवर चालू शकेल?

काय तो लिहील?

लिहू शकेल?

एखादी कविता की कवितासारखं काही तरी-कधीतरी

८.

जणू गर्भप्रवेश

तो जागा झाला तेंव्हा

सुमद्रात ओहोटी येते तशी

झोप हळूचकन ओसरून गेलेली

तरीही थोडीशी ओल अजूनही त्याच्या डोळ्यात साचलेली

पायात दुखणं नव्हतं

डोकं जड वाटत नव्हतं

काही हरवून गेल्याची खंत नव्हती

कुठेच कसल्याही मोजदादीत मन अडकलेलं नव्हतं

समुद्रात ओहोटी येताना

मंद मंद वाहणाऱ्या लाटांसारखाच काळ

पसरलेला होता-की नंतर

तो स्वत: अंथरला होता

जणू काळाबरोबरची सगळी देवाणघेवाण

पूर्ण झालेली नव्हती

पाहा की

नाही अंधार की उजेड

असा प्रकाश चारी दिशेला पसरलाय

हळूहळू वाहणाऱ्या वाऱ्याचा आधार घेत

तो बसला

उभा राहताना, आज

पायाला जराही शरीराचा भार वाटला नाही

जणू जमीन स्वत:च वर उचलली गेलेली 

त्याने थोडी पावलं भरली

त्याला कुठेही पोहोचण्याची घाई नव्हती

की नव्हता उतावीळपणा

वारा झाडात प्रवेशतो तसा

तो दरवाजातून प्रवेश करीत झालेला बाहेर

सगळंच मनासारखं चाललेलं होतं

असं कसं सांगायचं

त्याला माहीत होतं की

त्याच्यात काही वेगळंच सुरू होतं

शेवटी

झोपेवाटे जमीन प्रवेश करीत होती त्याच्यात

तिनं फिरून त्याला आपलंसं केलेलं

जसा काय त्याने पुन्हा

गर्भात केला होता प्रवेश. 

अनुवाद वर्जेश सोळंकी 

The Poetrywala Foundation is envisaged as a discerning and hospitable space in both digital and real-world mode for practitioners and readers of poetry and translation from India.

Copyright @2023  All Right Reserved – Designed and Developed by VR Webtek Solutions

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept