प्रबोध पारीख

आठवतंय, 

तुम्हाला किंवा आपल्याला किंवा मला

किंवा गुहावासीयांना किंवा वनवासीयांना

आकाशाखाली, नैरोबीत वा सांगलीत

ब्रेबॉर्न स्टेडियमच्या बाहेर, अग्निवलयांत 

साखळीडाव खेळताना नक्षत्रांत फिरत

एक खेळ सुरू केला होता?

श्वासाच्या स्पंदनाने, पृथ्वीच्या उबदार छातीत डोळे मिटून,

भित्तीचित्रे रंगवून, उंबरठे ओलांडून, ओंजळीत नद्या धरून

मैदानांपलीकडे निघून जायचा खेळ!

आठवतंय,

तुम्हाला किंवा आपल्याला किंवा मला वा सर्वांना,

कळत-नकळत, क्षर-अक्षरमध्ये पंख फडफडवत

दारा-खिडकीचे बोट धरून

टेकडीच्या टोकावरुन सूर मारून

अतल समुद्राच्या मांडीत बसायला

पायी चालत निघालो होतो

कॅप्टन नेमोबरोबर,

सबमरीनचा बिल्ला लावून!

मांडला होता एक खेळ!

चाळली होती पुस्तके,

आणि

त्या पानांमध्ये वसणाऱ्या पूर्वजांच्या सोबत आठवतंय,

शिबिरे उन्हाळ्याच्या सूट्टीतली?

नर्सिंग होममध्ये जन्माला यायला उत्सुक

जीव, सजीव अवतार, जे कान टवकारून

आपापली कथा सांगायला धडपडत होते

त्या वेळचे रसरशीत नवीन नाते हुलकावून

आरशात प्रकट झालेल्या चेहऱ्याच्या गुहेत,

गुहेच्या गर्भद्वारी गुंजता नाद

आणि कातरवेळी पडत्या सावल्या पकडायच्या खेळाचा

मजा घेतला होता तुम्ही, मी, आपण, ते आठवतंय?

आठवतोय, तो स्पर्श,

नसानसांतून वाहून जाणाऱ्या त्या स्पर्शांची स्पंदने 

— जागून काढायची ती रात्र

आणि अगणित चांदणे बघत

उत्स्फूर्त उन्मादाशी मैत्रीसाठी पुढे केलेला हात!

झणझणीत तिखट गोंडलच्या मिरच्यांसकट

तुरट, कडू, पारदर्शी शिगभर ग्लासमधून 

क्षणार्धात निघून सरणारे वाटसरूंसोबत

आणि

रामलीलाच्या जादूई सतरंजीवर बसून

किंवा भटकणाऱ्या मंडळीनी खांद्यावर घातलेल्या गाठोड्यात

लपून खेळलो होतो बदाम सत्तीचा डाव 

आणि तीनपत्ती झाल्यावर केली होती मेजवानी!

जन्माला आलो होतो, नवस बोललो होतो,

सेंट पॉलपासून जुम्मा मशिदीपर्यंत

नरनारायणाच्या देवळात जाऊन केली होती जागरणं 

आलो होतो ब्रह्मांड हिंडूनफिरून, आईच्या मांडीत, बापाच्या खांद्यावर

शेजारच्यांच्या झोपाळ्यावर, म्युझियमच्या बाकावर,

लायब्ररीत लपलेलो त्या सायबेरीयाच्या अंधाऱ्या कोठडीत

बसलेल्या माणसांनी एकरूप करून टाकले होते आप्तजनांच्या मिरवणुकीत!

आहे

का नाही आठवणीत 

नाही, चाहूल ऐवूâ येत नाही, की नाही थिरकले मेंदूचे स्नायू 

असं काही, जे आज येऊन बसलेत जवळ, अंगाला अंग लावून

धुंडाळत, डिवचत, चिडवत, हाणत, थांबवत, पाठीवर हात फिरवत

उठवतात 

एकत्र वाहून येणाऱ्या

हिरवळीसोबत ओढून आणणाऱ्या वेदनांना,

संवेदनांना–

हळूच शिदोरी देतात प्रवासासाठी!

आठवतंय, जन्माला आलो ते!

तुम्हाला, किंवा मला,

किंवा आपल्याला,

नाही, नाही आठवत, दारं खिडक्या

जिने वा पाळणे,

अ आकिलचा वा ब बेकेटचा किंवा प पतंगचा किंवा क कविताचा

आठवतंय, एक न संपलेला खेळ – इथे यायचा

तिथे, जिथे चादर पसरवायची, पानगळचा झेंडा फडकवायचा

खार सरकायची

ऊनसावलीची सेमिफायनल खेळली जायची

फुंकर मारताच सकाळ उडून जायची

आणि खुच्र्या घेऊन फिरायला निघणारे रस्ते, तिथे

आठवतंय,

नाव नोंदवल्याचे, सायकलवर बसून बावटे फडकवायचे

उगीच कोपऱ्यात रोवून गेलेल्या कळवळीला प्रेम करावे

आठवतंय, अपूर्ण खेळाची दोन चार व्याकरणे

पाच सात श्लोक, टिपून जाणारी बडबडगीते,

आणि दहा बारा इतर लोक, जे इतर नसायचे!

आठवतंय, तुम्हाला, मला, आपल्याला

जन्माला यायचे?

२.

आहे, एक घर, छोटे–

फुंकर मारताच उडून जाणारे, भिंती, खिडक्या, छत,

तसे–

एक शरीर आहे.

हाड, मांस, कातडीने गुंडाळलेले

(आट्टन नगर कतं मसलोरितलेपनं

यत्त जरा च बरचु च मानो बक्खो चं ओहितो।।)*

त्याचे दोन छोटे हात

धरायची तलवार का विणायची शाल

का प्रेमाने कडेवर घेऊन टाकावे रस्ता ओलांडणाऱ्या बाळाला

किंवा नंतर सांगत राहायचे, द्या तुमचा हात हातात!

— चालते फिरते भटकणारे दोन पाय

त्यांनी धावायचे की उडी मारून मांडी लावून बसायचे

की कोलमडून पडायचे झिंगून

ते असते,

आणि,

नसतेदेखील!

असते तेव्हा

एक अवतार, किंवा आश्चर्य, किंवा घटना

नसेल तरी ही

घटना, उगाच!

आणि मग आरशात बिंबवणार प्रतिध्वनी

नर्सिंग होममध्ये नाव नोंदवणार

छायाचित्र होऊन सावलीसोबत हजर,

देश-काळात,

गुहेत वा राजमार्गावर किंवा

दवाखान्यात, अग्नीच्या साक्षीने किंवा जिद्दीने

सूर्यनमस्कार करीत!

डोक्यावर हंडे भरून पाणी नेणारी

येणारी जाणारी घटना–

आहे

पिण्ड नावाने जीव,

मिठीत भरू शकतो

हातात हात घेऊन

घरात, आणि घराबाहेरही

पुरू शकतो, जाळू शकतो

बर्फाच्या पेटीत ठेवू शकतो

गिधाडांना किंवा सरहद्दीपलीकडच्या माणसांना सुपूर्द करू शकतो

नदीत वाहू शकतो!

असेल पण

नसेल पण!

आणि ऐकले आहे,

नकळतच कळले आहे

नाहीये, तरीही आहे

मन–

वाहणारे, जागवणारे, खेळवणारे, प्रश्न होऊन

रक्त, मांस, कातडी झाडून झटवूâन टाकणारे,

ढवळून टाकणारे–

जसं की घर, शरीर, तो डोंगर,

हे पक्षी, ती नक्षत्रे, हा पूल 

इथे पसरणारे सूर्यकिरण

तिथे भटकती नक्षत्रे–

आहे।

तसेच,

आहे, मन–

न सांगता उडून जाणारे, फडकवणारे, चपळ,

सकाळी भरत राहणारे, गुहेत लपून जाणारे,

संध्याकाळी नतमस्तक परतणारे

मन!

ते असतं

आणि

नसेलसुद्धा!

गहकारकदिट्टोसि पुनगेहंन काहसि!

सब्बा ते फासुका भग्गा गहकूटंविसंखते!**

– अनुवाद : अश्विनी बापट

 

*रिक्त-मांसाचा लेप लावलेला अस्थीचा सापळा बनवला आहे, त्यामुळे जरा आणि मृत्यू आणि मान आणि इतरांची अवज्ञा चुकलेल्या आहेत.

**घर बांधणारा तू दिसला आहेस, तू पुन्हा घर बनवू शकणार नाहीस, तुझ्या बरगड्या मोडल्या आहेत. 

 – अनुवाद : अश्विनी बापट 

The Poetrywala Foundation is envisaged as a discerning and hospitable space in both digital and real-world mode for practitioners and readers of poetry and translation from India.

Copyright @2023  All Right Reserved – Designed and Developed by VR Webtek Solutions

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept