रवी लाखे
नवनिर्माण

१.

मी एक गरुड शोधला.

त्याच्या परवानगीने त्याचे पंख कापून घेतले.

एका रंगीबेरंगी फुलपाखराला पकडलं.

फुलपाखरालाही विनंती करून त्याचे पंख कापले.

गरुडाचे पंख मी फुलपाखराला लावले

फुलपाखराचे पंख गरुडाला लावले.

मी मग पसायदान म्हटलं माऊलींचं.

या सोहळ्यात सामील झालेल्या सार्‍यांनी

माझ्या स्वरात स्वर मिसळला

पसायदानाच्या आकाशात गरुड आणि

फुलपाखरू एकमेकांच्या हातात हात

घेऊन स्वच्छंद उडायला लागले.

२.

एका गढीत मला एकट्यालाच

कुणीतरी कोंडून ठेवलं.

माणूस एकही नाही- झाडंझुडपं

पशू पक्षी किडामुंगी होते

एकही माणूस माझ्याशी बोलायला

नसल्यामुळे मला झाडाझुडपांची

पशुपक्ष्यांची भाषा कळायला लागली.

त्या भाषेच्या परिघापलीकडे गेल्यावर

भवतालाने माझ्याशी नातं जोडलं.

३.

सर्वांभूती एकच विभूती आहे

विभूतीचा रंग राखेचा असतो

सर्व भुतांना विविध रंग नाहीयत.

रंग कात टाकतात

ती कात पांघरता येत नाही

माझिया जातीचे म्हणतात तसं

भेटो कोणी माझिया कातीचे

अंतरंगी पाणी भवसागराचे.

४.

अतीताची तिथी उगाळली

वर्तमानाच्या सहाणेवर भावनेच्या खोडाने

ज्याची फलद्रूपता होते

भाळावरील अनाम गंधात

५.

जीवनमृत्यूच्या परंपरेला

काबूत ठेवावं नवनिर्माणाच्या कासऱ्याने

म्हणून माझे हे ओरंबळणे

सार्थ करा श्रोते हो.

६.

जगण्याला बगल देऊन मुक्ती मिळवणं

हे मृगजळात नहाण्यासारखं आहे

मला माझ्या गुरूंनी अक्षय रिक्तता दिलीय

मुक्ती देऊनच मला पाठवलंय

सत्याची गोष्ट सांगायला

ज्या गोष्टीत सत्य सापडत नाही

जग कसं पाहावं हे सांगताना

जे दिसत नाही त्याचं

वर्णन ऐकू येईल लोकांना

७.

प्रतीक्षेचा अंत केला त्या क्षणात

उगव गवसला मला कोवळा

धारोधार झालेल्या माझ्या देवाचा

माझ्या शिवणीला बाधा देऊन उध्र्वगामी

वसलाय तो माझ्या निरंतरी.

कारूणिक आज्ञेला त्याच्या पाळतोय मी

या ओळीओळीत जीवाचे तुकडे ओवून.

८.

वाटेल तुम्हा येरवीच ओरंबळतोय मी

पण हा जलसा आहे निरिच्छ इंद्रियांचा

षड्जात आहे षड्ज दयाघनाच्या

फुलपाखरू घेतंय गरुडझेप स्वरांकित

एकेका स्वरानंतर एकेका युगाची आस

९.

ही चांदमारी वेगळी आहे

इथं दिठा असतो अंगठा

परात्पराच्या दर्शनाचा वेध घेऊन

पुढे जातो आत्मा

उधळत मागे आयुष्याच्या

अवघा कालिक ऐनजमा

या चांदमारीत जयपराजयाचा

नसतो कसलाही खोडा.

१०.

अवगाहन माझ्या अंतरी केले देवाने

झाले त्याला निदान अहंतेचे माझ्या

अखिलाचे भान सुंदर केले त्याने माझे

मेली माझी रास ग्रह माझे सर्व मेले

११.

कालप्रवाहातून मी निमिष स्वतंत्र केलं

नैमिष्यारण्यातून भ्रमंती करताना मला यायला लागली

एक नवी भाषा व्याकरण नसलेली

स्वसंवादात नष्ट झाली देहाची आवर्तनं

आता माझा अंतरात्मा झालास तू

मनाच्या हालचालीं जगाचे नियम धुडकावून

मनाच्या अरूपात ठाम झाल्या.

१२.

अर्थ-निरर्थाच्या संगमावर उभा आहे मी

इथून दिसणाऱ्या टापूत दिसताहेत मला

जगातल्या विश्वनिर्मितीपासूनच्या विघटना

एकेक विघटनेवर पाय ठेवत मी पार करीन हा भवसागर

१३.

माझा जन्मच करुणेला वश झालेला आहे

करुणेचा हात धरून मी शिकलो आहे

श्रीगणेशा या अनिर्मित अनिर्वचनीय भाषेचा.

१४.

गरुड आणि फुलपाखराच्या हातांच्या पकडीत

आहे वर्तमानात जगण्याचा अवघा अर्थ

फुलपाखराने पकडलाय गरुडाचा वेग

की गरुडाने पकडलाय फुलपाखराचा वेग

हा प्रश्न फिजूल ठरावा असा त्यांचा उध्र्वगामी प्रवास आहे

दोघांच्या झेपेने गाठली आहे स्थितीशील गती.

The Poetrywala Foundation is envisaged as a discerning and hospitable space in both digital and real-world mode for practitioners and readers of poetry and translation from India.

Copyright @2023  All Right Reserved – Designed and Developed by VR Webtek Solutions

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept