सुनीता झाडे
भाषा

आईने आधी

मास म्हणून वाढविले…

मग शरीर म्हणून…

मग मुलगी म्हणून…

मग माणूस म्हणून…

मग व्यक्ती म्हणून…

तिच्या आयुष्यातील स्थित्यंतराप्रमाणे

माझ्या शरीराची भाषा बदलत गेली

र क्त प्र ह र…

या दोन दिवसांत

अंगातून इतकं रक्त वाहून गेलंय की

वाटतं… एक माणूस जगन्ता आला असता

या दोन दिवसांत

अंगातून इतकं रक्त वाहून गेलंय ना

पदरचे पदर निसटलेत दडलेल्या जावळासहीत

या दोन दिवसातील रक्तप्रहर

वाटतं कितीकच धुमश्चचक्रीचा बदला

किती जणांचा नरसंहार आतल्या आत

सगळी कारणे, सगळे खुलासे

सगळी परिणामकारकता समजावूनही

त्या परिमाणाना लाथाडत

साधने हिसकावत

नराधम करून टाकण्यात आलेल्या माणसाची ‘रगतपीती’

हो रगतपीतीच

या दोन दिवसांत

अंगातून इतकं रक्त वाहून गेलंय ना

की शाईचा रंगही लाल झालेला दिसतोय 

स्खलनाचा भास…

माझ्या माघारी

मुलीचे डोळे सुजलेले दिसतात

मी विचारते तिला

रडली का?

हो बाबांची आठवण येतेय?

तुझीही येत होती…

तिच्या डोळ्यावरून तपते हात फिरवते

दर वेळचा विश्वास याही वेळेस देते

बबडे, आता मीच तुझा बाबा

हो ते य

आता मी अधिकाधिक

बाबा होण्याच्या प्रयत्नात…

कधीतरी पहाटे

स्खलनाचा भास… 

बाई घरच्या घरी वेश्या होते

तो म्हणतो,

कधीही, कुठेही,

कशाहीसाठी

मी तुला पोसतो

ती,

कधीही, कुठेही,

कशाहीसाठी नाही

पण कधी तरी म्हणते

त्या बदल्यात

मी तुझ्यासोबत झोपते

बाई घरच्या घरी वेश्या होते 

बाया

काही बाया कायम ओलत्या

बोटं रुतवलं तर पाणी उमटावं अशा…

काही बाया अगदीच शुष्क

जसा पानावलेल्या छातीवरील पदर कोरडा…

काही बाया राठ, राकट…

अंगाच्या रंगानी अधिकाधिक गडद होत जाणा‍ऱ्या…

काही बाया बायाच

इतरांपेक्षा ब‍ऱ्या म्हणून उन-उन सहानुभूती घेणा‍ऱ्या…

काही बाया वडील चेह‍ऱ्याचा

घरी दारी वडील होत जाणा‍ऱ्या…

काही बाईपणाच्या ताबुतातून

बाहेर पडलेल्या

स्वत:ला सोलून काढत

नवतीच्या मोहर्रम मध्ये शामिल होत असलेल्या…

बाया

म्दस्स्दहैदसहॅुस्aग्त्.म्दस् 

The Poetrywala Foundation is envisaged as a discerning and hospitable space in both digital and real-world mode for practitioners and readers of poetry and translation from India.

Copyright @2023  All Right Reserved – Designed and Developed by VR Webtek Solutions

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept